HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली संजय राऊतांची अग्रलेखातून टीका!

मुंबई। देशाच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धूंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तर गेल्या 15 दिवसांपूर्वी पंजाबचा मुख्यमंत्री बदलून राहुल गांधींनी धाडसी पाऊल टाकलं. पण आता काँग्रेससमोर मोठं संकट उभं ठाकलंय. सिद्धूही नाराज, कॅ. अमरिंदर सिंगही पक्ष सोडण्याच्या तयारीत…! काँग्रेससमोरच्या याच सगळ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचा नेमका काय गोंधळ उडालाय, काँग्रेस चुकतंय कुठे?, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, असा आरोप करत पक्षात मूळच्या बोलघेवड्यांची कमी नाही, त्यात सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकायला नको होता, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली

पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात.काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय?

अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे

काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?जितीन प्रसाद यांना काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद दिले होते. हे प्रसाद भाजपात गेले व त्यांना उत्तर प्रदेशात मंत्री केले. भाजपकडे मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून आज लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, असा घोर लागला आहे. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का, याचा विचार व्हायला हवा.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले

काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?तिकडे 79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्डय़ात टाकतील, असे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाळासाहेब थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीची चौकशीची मागणी का केली? ” दीपक केसरकारांचा नारायण राणेंना सवाल

News Desk

कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन

News Desk

भूम तहसिल कार्यालयाच्या महसूल पथकावर वाळू माफियाचा जीवघेणा हल्ला; तलाठी व मंडळ अधिकारी जखमी 

News Desk