HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे! – देवेंद्र फडणवीस

नागपूर |  न्याय विधि क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातून तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठ त्यासाठी सहाय्यक ठरावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुलामुलींचे वसतिगृह व सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

नागपूर येथील बुटीबोरी परिसरातील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या परिसरात आयोजित या सोहळ्यात आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांच्याहस्ते मुलामुलींच्या वेगवेगळ्या वसतिगृहाचे व सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस.नरसिम्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, कुलगुरु प्रोफेसर डॉ.विजेंद्रकुमार, अधिष्ठाता आशिष दीक्षित उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर.विमला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस.सिरपूरकर, खासदार कृपाल तुमाने, माजी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, राज्याचे माहिती आयुक्त राहूल पांडे  यांच्यासह न्याय व विधि क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासनातील वरिष्ठ उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांनाच्या काळापासून पक्षीय मतभेद सोडून राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. येणाऱ्या पिढीसाठीचे हे काम असून दर्जेदार मनुष्यबळ निर्मितीची बीज पेरणी या माध्यमातून करायची आहे. दर्जेदार मनुष्यबळ व शैक्षणिक सुविधा, आर्थिक विकासाचा मूलमंत्र आहे. ज्या ठिकाणी शैक्षणिक दर्जा उत्तम असतो. त्या ठिकाणी विकास दिसून येतो. या विद्यापीठाच्या विकासाचा पुढील काही वर्षांचा रोड मॅप तयार करा. या विद्यापीठाला पायाभूत सुविधांसाठी यापुढे कर्ज घ्यावे लागणार नाही. शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “वसतिगृह केवळ शैक्षणिक प्रगतीच करत नाही. तर ते प्रेरणादेखील निर्माण करतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकत होते. त्या संस्थेमध्ये आजही त्यांचे नाव सन्मानाने व आदरपूर्वक घेतले जाते. त्यामुळे हे वसतिगृह आपल्या अस्तित्वातून मोठे करा.” लंडन येथे बाबासाहेब शिकत असलेल्या घराची खरेदी मुख्यमंत्री असतांना राज्य शासनाने केली असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

ज्या समाजात न्यायाचे राज्य आहे ते राज्य, राष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करते. भारताला तिसऱ्या क्रमांकाची  महासत्ता बनायचे आहे. त्यामुळे अन्य राष्ट्रांना आकर्षित करण्यासाठी  देशात कायद्याचे प्रभावी राज्य निर्माण करणे आवश्यक आहे. सामान्य माणसाची शेवटची आशाही न्यायालय असते. त्यामुळे भारताची न्यायिक व्यवस्था विश्वासार्ह आहे, असा संदेश जागतिक स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी भारताचा गौरव वाढविणारे विद्यापीठ निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी संबोधित केले. राष्ट्रीय विधि महाविद्यालय निर्मितीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या सोबतच्या 2016 च्या  बैठकीपासून सुरू झाली. ज्या पद्धतीने आराखडा तयार करण्यात केला होता त्या पद्धतीची इमारत कालमर्यादेत आज उभी राहिल्याचा आनंद आहे.  नागपूर आता ‘एज्युकेशन हब’ बनत आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या येत आहेत. बुटीबोरी ते कन्हान हा मेट्रो मार्ग सुरु होणार आहे. या मार्गावर विधि विद्यापीठासाठी विशेष थांबा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

आपली लोकशाही ही चार स्तंभावर उभी आहे. त्यामधील न्यायव्यवस्था अतिशय बळकट, दर्जेदार असणे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. लोकशाही चालविणारा यंत्रणेतील प्रत्येक घटक हा दर्जेदार असणे आवश्यक आहे, त्यासाठी विद्यापीठाला जागतिक दर्जाची ओळख बहाल करा, असे आवाहन त्यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी आपल्या भाषणात एक नागपूरकर या नात्याने भव्य वास्तू व दर्जेदार शिक्षणाचे केंद्र उभे राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यामध्ये गेल्या पाच वर्षात मदत केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांनी नामोल्लेख करीत आभार व्यक्त केले. यावेळी कुलगुरु प्रोफेसर डॉ.विजेंद्रकुमार यांनी प्रास्ताविक केले. तर न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा, न्यायमूर्ती अनिल किलोर यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुलसचिव आशिष दीक्षित, संचालन डॉ.सोपान शिंदे, डॉ.दिविता पागे यांनी केले. या कार्यक्रमात उच्च तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विधि विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, अधीक्षक अभियंता एस.पी.दशपुते, अभियंता हेमंत पाटील जनार्धन भानुसे, प्रशांत भुरे, परमजित आहूजा आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहिण-भाऊ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर

swarit

म्हाडा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने होण्यासाठी मुद्रांक शुल्काबाबतचे धोरण निश्चित करा! – उद्धव ठाकरे

Aprna

राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

News Desk