HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध! – उपमुख्यमंत्री

पुणे | महाराष्ट्र आणि पुण्यात नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान असून महाराष्ट्र स्वीडन (Sweden) बरोबर भागीदारी करण्यास आणि राज्यातील गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

एसकेएफ कंपनीच्या भारतातील शतकपूर्ती महोत्सवानिमित्त हॉटेल रिट्झ कार्लटन येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, स्वीडनचे भारतातील राजदूत जॅन थेस्लेफ, मुंबई येथील महावाणिज्य दूत ॲना लेकवॉल, एसकेएफचे चेअरमन हॅन्स स्ट्रॉबर्ग, प्रेसिडेंट व मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड गुस्टाफसन, प्रमुख गुंतवणूकदार मार्कस वॉलनबर्ग, उद्योजक बाबा कल्याणी, एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवर हाऊस’ आहे. राज्य देशाच्या जीडीपी मध्ये १४ ते १५ टक्के भर घालते. एकूण औद्योगिक उत्पादनाच्या २० टक्के महाराष्ट्रात होते. देशातील २८ टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. पुणे हे नाविन्यता आणि तंत्रज्ञान हब बनले आहे. नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान पुणे आणि महाराष्ट्रात आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, एसकेएफ कंपनीचे भारतात ६ उत्पादन प्रकल्प आहेत. मात्र त्यापैकी केवळ एकच महाराष्ट्रात, पुण्यात आहे. महाराष्ट्राची क्षमता पाहता एसकेएफने देशात अजून ६ प्रकल्प सुरू करावेत आणि त्यापैकी ५० टक्के महाराष्ट्रात सुरू करावेत असे आवाहन त्यांनी केले. आम्ही स्वीडन आणि देशातील सर्व व्यावसायिकांचे कायमच स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

भारतामध्ये गुंतवणुकीला मोठे भविष्य- गजेंद्रसिंह शेखावत

केंद्रीय जलशक्ती मंत्री  शेखावत म्हणाले, भारत ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री  मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकसित देश बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. सर्व क्षेत्रामध्ये जगातील सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहे. पाण्याच्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आपला असून ४ कोटी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देशात गुंतवणुकीला मोठे भविष्य असून स्वीडनने आणि एसकेएफ कंपनीने सर्वच क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल म्हणाले, कंपनीचा १०० वर्षांचा प्रवास ही खूप मोठी बाब आहे. खऱ्या अर्थाने ही कंपनी भारतातील स्वीडनची राजदूत आहे. शाश्वत उत्पादन, कौशल्य विकास आणि सामाजिक समावेशनात मोठी भर घातली आहे. स्वीडन आणि भारताने औद्योगीक आणि उत्पादन क्षेत्राद्वारे राष्ट्रीय संपत्ती निर्माण केली आहे. आपल्याला भविष्यासाठी महत्वाकांक्षी रहायला हवे. दोन्ही देशांनी परस्पर औद्योगिक गुंतवणुकीसाठी अधिक प्रयत्नशील रहायला हवे. भविष्यकाळ हा हरित आणि शाश्वत विकासाचा राहणार असून त्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.

यावेळी भटनागर यांनी कंपनीच्या भारतातील वाटचालीचा आढावा घेतला. कंपनीने भारतातील पहिला प्रकल्प पुणे येथे १९२३ साली सुरू केला. बेअरिंग उत्पादनापासून वाटचाल सुरू केल्यानंतर आता विविध दर्जेदार उत्पादने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भटनागर यांनी एसकेएफच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी प्रकट संवाद साधला. भारतातील राजदूत आणि भारताचे स्वीडन मधील राजदूत तन्मया लाल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. तत्पूर्वी कंपनीच्या भारतातील प्रवासाविषयी चित्रफीत दाखवण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत !

News Desk

इस्रोच्या ‘जीसॅट-7 ए’ या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

“मुंबईतील सर्व निर्णय ‘मातोश्री’तून, दिलीप वळसे पाटील हे आपले बिचारे”, चंद्रकांत पाटलांचा टोला

Aprna