पुणे | एकीकडे सत्ताधारी पक्षातील नेते राज्यातील परतीच्या पावसाने किती नुकसान केले याची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही आज (१९ ऑक्टोबर) बारामतीच्या दौैऱ्यावर आङेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना टोला लगावला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरुन झालेला विवाद याआधीदेखील झाला आहे. पण ही काय वादाची वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, असे फडणनीसांनी ठणकावून सांगितले आहे. फडणवीस आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील उंडवडी गावाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
“राज्यातील शेतकरी सध्या गंभीर परिस्थितीत आहे. तुमचे राज्यपालांशी मतभेद सुरुच राहतील. यापूर्वी एकाच पक्षाचे सरकार असताना, त्याच पक्षाने राज्यपाल नियुक्त केलेले असतानादेखील राज्यपालांशी मतभेद झालेले आहेत. त्यामुळे आता तो विषय नाही. आता शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचं आहे”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मी बोलणार नाही. पण अशी सोयीची राजकीय भूमिका कोणीही घेऊ नका. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको आहे. तुम्ही काय करणार हे सांगा. पंचनाम्याची वाट न पाहता तात्काळ मदत करा. गुरांना चारा द्या”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“राज्यात अतिवृष्टी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: मुख्यमंत्र्याना फोन करुन मदतीचं आश्वासन दिलं आहे. केंद्र सरकार नेहमीच मदत करतं. पण राज्याची पहिली जबाबदारी आहे. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं”, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
आपल्याकडे एक म्हण आहे पण ती इथे लागू होईल की नाही सांगता येणार नाही. ती म्हण, शहाण्याला शब्दाचा मार अशी आहे. मात्र यातील हा शब्द इथे योग्य आहे की नाही सांगता येणार नाही, असं पवार यांनी म्हटलं आणि पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.