HW News Marathi
Covid-19

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का?, सामनातून भाजपला सवाल

मुंबई | भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का? सहा दशकांत काहीच घडले नाही का?, असा सवाल शिवसेनेच मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपा केला आहे. सामना म्हटले, “आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे. त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही. महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती.”

पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षांत चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षांतही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? ते आधी सांगा. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?, असे म्हणत सामनातून मोदींवर टीका केली आहे

सामनाचा आजचा अग्रलेख

पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाले. कोरोनाचे संकट नसते तर दुसर्‍या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन भारतीय जनता पक्षाने थाटात साजरा केला असता. तरीही समाज माध्यमे व प्रसिद्धीमाध्यमांच्या मदतीने हा पहिला वर्धापन दिन झोकात साजरा केला असे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून दिसते. मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत. दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भाजप पुढार्‍यांची विधाने प्रसिद्ध झाली आहेत ती गमतीची आहेत. मागील 70 वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या 6 वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे जरा वेगळे आहे. पंतप्रधान मोदी यांनी सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले आहे असे श्री. शहा म्हणतात. कोरोना संकटकाळात मोदी हे पंतप्रधान आहेत हे भारत देशाचे भाग्यच म्हणावे लागेल असा बाण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मारला आहे. मोदी यांचा आत्मनिर्भर भारत नेमका कसा घडतो आहे ते या तीन प्रमुख नेत्यांच्या बोलण्यातून दिसते. एकंदरीत असे दिसते की, आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे. त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही. महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले असे सांगितले जाते ते सर्व

बोलबच्चनगिरीचे नमुने

आहेत. श्री. नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत, पण त्यांनी जे सांगितले ते हास्यास्पद आहे. कोरोनाचे संकट जागतिक आहे. बड्या राष्ट्रांच्या आरोग्य सेवा कोलमडल्या असताना हिंदुस्थानात लॉक डाऊनच्या काळात दररोज कोरोना टेस्ट क्षमता 10 हजारावरून 1.60 लाखांवर गेली आहे. आज देशात दररोज 4.50 लाख पीपीई किटस् बनविल्या जात आहेत. 58 हजार व्हेंटिलेटर्स बनत आहेत. हे आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही काय? असा प्रश्न डॉ. नड्डा विचारतात. अर्थात याआधी देशातून पोलिओसारखे आजार हद्दपार केले गेले. टीबी, मलेरिया नियंत्रणात आणला हे कोणत्या सरकारने केले? कोरोना आज आला, त्याआधी प्लेगसारखी महामारी येऊन गेली. डॉक्टरसाहेब, देशात व्हेंटिलेटर्स आधीही होतेच व ती चीनकडून मागवली जात नव्हती. मागच्या साठ वर्षांत ‘कोरोना’चे संकट नव्हते. त्यामुळे आजच्या इतकी व्हेंटिलेटर्सची गरज नव्हती, पण साठ वर्षांत ‘एम्स’सारख्या वैद्यकीय संस्था, लाखो डॉक्टर्स, सरकारी इस्पितळे, आयसीएमआरसारख्या संस्था निर्माण झाल्या. ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या प्रे. ट्रम्प यांनी दमदार आवाजात हिंदुस्थानकडे मागितल्या (कोरोनाशी लढण्यासाठी) त्या गोळ्यांचे उत्पादन इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरू झाले व त्याच आत्मनिर्भरतेतून देशात वैद्यकीय क्रांतीची बीजे रोवली हे कसे विसरता येईल? मोदी यांनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या हे मान्य. कश्मिरातून 370 कलम हटवले. तीन तलाक पद्धत बंद केली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यासंदर्भात निकाल दिला. हे सर्व मागच्या सहा वर्षात झाले व त्याबद्दल मोदी सरकारला श्रेय द्यावेच लागेल, पण 1971 साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ‘फाळणी’चा सूड घेतला ही ऐतिहासिक चूक मानायची की, ऐतिहासिक कार्य? हेसुद्धा समजून घ्यावे लागेल. राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी कोसळलेल्या अर्थव्यवस्थेस गती दिली.

म्हणूनच आजचा हिंदुस्थान

उभा आहे. ही चूक असेल तर ती कोणत्या मार्गाने तुम्ही दुरुस्त करणार आहात? ज्या 70 वर्षांतील उणीवा 6 वर्षांत दूर झाल्या त्या 70 वर्षांत अटल बिहारी वाजपेयी यांची साडे पाच वर्ष, विश्वनाथ प्रताप सिंग व चंद्रशेखर यांची मिळून दोनेक वर्ष व जनता पक्षाची सव्वा दोन वर्ष आहेत. हा कालखंड वाया गेला व फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल. वीर सावरकर यांचा अपमान करण्याची घोडचूक मागच्या साठ वर्षांत नक्कीच झाली, पण ही घोडचूक दुरुस्त करण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग गेल्या सहा वर्षांत स्वीकारला गेला नाही. सहा वर्षात जे घडवले गेले ते जगासमोर आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेचे पानिपत झाले. गरिबी वाढली. रोजगार संपला. प्रत्येक चार माणसामागे आज एकजण बेकार आहे. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढून आणि विकून आर्थिक सुधारणांचा डांगोरा पिटला जात आहे. एअर इंडियासारख्या राष्ट्रीय कंपन्या कधीही जमिनीवर कोसळतील. कश्मिरातील तणाव 370 हटवूनही संपलेला नाही. सिक्कीम आणि लडाखच्या सीमेवर चीनचे सैन्य आमच्या छाताडावर बंदुका ताणून उभे आहे. नेपाळसारखे मुंगीइतके राष्ट्र आमच्या भूभागावर हक्क सांगत आहे. हे काही आत्मनिर्भर मजबूत असल्याचे लक्षण नाही. पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षांत चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षांतही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? ते आधी सांगा. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

News Desk

राज्यात आज पुन्हा ३० हजारांच्या आत आढळले रूग्ण तर बरे डिस्चार्ज रूग्ण संख्या वाढली

News Desk

शाळा नाही तरी जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे !

News Desk