HW News Marathi
महाराष्ट्र

ड्रायपोर्ट, सॅटेलाईट पोर्ट, एअरपोर्टमुळे सांगलीचा चौफेर विकास होणार! –  नितीन गडकरी

सांगली । सांगली जिल्ह्याची द्राक्षे, उद्योगातून तयार होणार माल, हळद, साखर थेट परदेशात निर्यात होऊ लागल्यास सांगलीची आर्थिक स्थिती बदलेल व सांगली हा महाराष्ट्रातील समृध्द व संपन्न जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये पाण्याची, रस्त्यांची, ऊर्जेची सोय झाली. आता ड्रायपोर्ट सॅटेलाईट पोर्टही येणार आहे. त्या ठिकाणी एअरपोर्टही येईल, त्यामुळे सांगलीचा चौफेर विकास होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

राजमती मैदान, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे 2 हजार 334 कोटी किंमतीच्या 96.78 कि. मी. लांबीच्या दोन महामार्ग प्रकल्पांचे डिजीटल पध्दतीने लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अरूण लाड, माजी महसूल मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील, माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, राष्ट्रीय महामार्गाचे रिजनल मॅनेंजर अंशुमन श्रीवास्तव, नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, दिपक शिंदे, सत्यजित देशमुख, शेखर इनामदार, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, पुणे ते बेंगलोर हा नविन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून याची लांबी 699 कि. मी. आहे. हा पूर्ण ग्रीन हायवे असून याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे. हा महामार्ग पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागातून जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे या दुष्काळी भागाचाही कायापालट होईल. यासाठी जवळपास 40 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सांगलीसाठी आणखी एक महामार्ग प्रस्तावित आहे तो म्हणजे सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी. हा महामार्गही तयार करण्यात येईल. यालाही 160 राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा पेठ ते सांगली या महामार्गाचे काम येत्या तीन ते चार महिन्यात सुरू होईल. त्याबाबतचे टेंडर तातडीने निघेल. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या सात वर्षात जी रस्त्यांची लांबी होती ती जवळपास साडेतीन पटीने वाढली आहे. तशीच ती महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी आत्तापर्यंत 5 लाख कोटी रूपयांची कामे महाराष्ट्रात करण्यात आली आहेत.

सांगलीमध्ये प्रामुख्याने तयार होणारी साखर, हळद, द्राक्ष तसेच बेदाणे थेट पदरेशात पाठविण्यासाठी सांगली येथे सॅटेलाईट ड्रायपोर्ट उभा करण्यात येईल असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल व सील झालेले कंटेनर्स थेट परदेशी बाजारपेठेत पाठविण्यात येतील. असा सुविधायुक्त लॉजिस्टीक पार्क, सॅटेलाईट ड्रायपोर्ट तयार होईल. यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध करून द्यावी. या उभारणीसाठी देशात 2 लाख कोटी इतकी तरतूद आहे. आत्तापर्यंत जालना, वर्धा, नाशिक या ठिकाणी ड्रायपोर्ट तयार झाले आहेत. आता सांगलीचाही ड्रायपोर्ट लवकर तयार होईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू होईल. यामध्ये केंद्राचा व राज्याचा प्रत्येकी 50 टक्के निधी असेल, असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, सांगलीमध्ये उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टीक पार्कमध्ये साडेतीन कि.मी. चा सिमेंट क्राँक्रीटचा रोड असा बांधण्यात येईल की ज्यावर कोणतेही मोठे विमान उतरू शकेल. यामुळे सांगलीमध्ये एअरपोर्ट लॉजिस्टीक पार्क, प्रि कुलींग प्लँट, कोल्ड स्टोअरेज थेट आयात निर्यात व्यवस्था जिल्ह्यासाठी निर्माण होईल. त्यामुळे सांगलीचा आर्थिक विकास होईल. यासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुणे ते बेंगलोर हा नविन महामार्ग प्रस्तावित असून याची लांबी 699 कि. मी. आहे. हा पूर्ण ग्रीन हायवे आहे. याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातून हायवे जाणार आहे. यामुळे या दुष्काळी भागाचाही कायापालट होईल. यासाठी जवळपास 40 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सांगलीसाठी आणखी एक महामार्ग प्रस्तावित आहे तो म्हणजे सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी. हा महामार्गही तयार करण्यात येईल. यालाही 160 राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. या महामार्गासाठी बायपासही प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे ही काम मंजूर करून लवकरात लवकर सुरू करू. या रस्त्यांचे कामही सिमेंट क्राँक्रिटचे असल्याचे केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी यांनी सांगितले.

ऊसाच्या चिपाडापासून व बायोमास पासून बिटूमिन तयार केले आहे. याचा वापर यापुढे राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता उर्जादाता बनले पाहिजे. येणाऱ्या काळात बिटूमिनची आवश्यकता राहील हे बिटूमिन महामार्गाच्या कामांमध्ये वापरण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, दुष्काळी भागातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या ठिकाणी केंद्र शासनाकडून शेततळे शेतकऱ्यांसाठी मोफत बांधून देण्यात येईल. रूंदीकरण व खोलीकरणात जो कच्चा माल निघेल तो महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येईल. त्याचबरोबर रेल्वेच्या क्रॉसिंगसाठी असणारी जेवढी फाटके आहेत त्या ठिकाणी अंडरब्रिज किंवा ओव्हरब्रिज आवश्यकतेप्रमाणे दिले जातील. त्यासाठीही प्रस्ताव पाठवावेत. त्यासाठी खात्यांतर्गत 10 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. यामुळे संपूर्ण देशात रेल्वे सेवा व रस्ते सेवा फाटकमुक्त होईल. सांगली सोलापूर हा 185 कि.मी. चा रस्ता असून हे अंतर केवळ दीड ते दोन तासात पूर्ण होईल असा विश्वास आहे. देशांतर्गत रस्त्यांच्या रूंदीकरणामुळे लागणाऱ्या प्रवासाची वेळ ही जवळपास अर्ध्यावर आली असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा सुखी, समृध्द व संपन्न झाला पाहिजे यासाठी व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री म्हणून महाराष्ट्राचा ॲम्बेसिडर म्हणून काम करत आहे. एक मराठी माणूस म्हणून मला नेहमी अभिमान राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे राज्य देशात नंबर एक चे झाले पाहिजे असे मला वाटते असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा व इतिहास आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्याबरोबर महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत गजानन, संत गाडगे महाराज अशी संतांची परंपरा आहे. पर्यटन हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात आता रोप वे, केबल कार ही अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वच उत्कृष्ट टेक्नॉलॉजी देशात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्वच ठिकाणी मेट्रो सुरू होणे शक्य नाही यामुळे या ठिकाणी हवेतून चालणारी बस चालू करण्याचा विचार आहे. यासाठी रोप वे, केबल कार अशांसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावेत. आत्तापर्यंत अशा प्रकारचे 60 प्रकल्प देशामध्ये मंजूर केले आहेत. यामध्ये उत्तराखंड, काश्मिर, हिमाचल प्रदेश यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

येत्या काळात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, रस्ते बांधकामाबरोबरच जलसंवर्धनाच्या कामावरही भर देणार आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात आणि घरातील पाणी घरात अशी ही संकल्पना आहे. सध्या सांगली – सोलापूर रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे. या रस्त्याच्या बांधकामात जेवढ्या नदी, नाले, ओढे येतील त्या सर्वांचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 1995 मध्ये बांधकाम मंत्री असताना सांगलीमध्ये येण्याचा योग आला. त्यावेळी एकाच वेळी चार पुलांचे भुमिपूजन केले होते. त्यानंतर बऱ्याच वेळा येण्याची संधी मिळाली. पण आज महाराष्ट्रात सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. विदर्भाच्या अनुशेषाबद्दल यासाठी बराच प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी मोलाची साथ दिली. यावेळी दुष्काळी भागात पाण्याच्या सिंचन योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी पैसाही उभा करण्याचे काम केले आणि दुष्काळी भागात सिंचन योजनांचे काम सुरू केले. यासाठी सिंचन महामंडळाची निर्मिती केली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र यामधील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुरूवात केली. सांगली, सातारा, सोलापूर या भागातील सिंचनांच्या योजना मोठ्या प्रमाणात होत्या. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी थोडा उशीर झाला यामुळे यांची निर्मिती किंमत वाढली. याचवेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना म्हैसाळचे पाणी दुष्काळी भागात कशा प्रकारे घेवून जाता येईल यासाठी प्रयत्न केले. यासाठी बळीराजा योजना तयार केली आणि यामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त कामे झाली आहेत. त्या सर्व योजनांकरिता प्रधानमंत्री सिंचन योजनेतून पश्चिम महाराष्ट्राकरिता 6 हजार कोटी रूपये मंजूर केले. यामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग सिंचनाखाली आला याचा आनंद असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील महामार्गावरूनर ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी आम्ही वेगळ्या प्रदेशात, देशात आलो आहे, एवढ्या उत्तम दर्जाचे रस्ते केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले आहेत. हा कार्यक्रम भारताच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा आहे. अमेरिका व युरोप ची प्रगती होण्यामागे मूळ कारण तेथील रस्ते व रेल्वे आहे. रस्ते या विषयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांनी अतिशय प्रभावी काम केले आहे. त्यांनी ज्या ठिकाणी हात घातला तिथे प्रकल्प वेगात पूर्ण केले. सांगली जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे चांगले काम झाले आहे त्याचे सर्व श्रेय गडकरी यांना जाते. एखादा मंत्री धाडसाने नियमाला वळण देवून कसे काम पूर्ण करू शकतो, झपाट्याने कसा रिझल्ट देवू शकतो तो आदर्श भारतामध्ये श्री. गडकरी यांनी घालून दिला आहे. रस्त्याचा दर्जा आज सर्व भारतामध्ये समान आहे. सर्व ठिकाणी समान क्वालिटीचे रस्ते होणे हे काम सोपे नाही. अतिवेगाने रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न गडकरी यांनी सुरू केला आहे. पेठ नाका ते सांगली व कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे या रस्त्यांचे काम प्राधान्याने घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट होणे महत्वाचे आहे. यासाठी राज्यसरकारची जी आवश्यकता आहे त्याची जबाबदारी मी घेत असून या जिल्ह्याच्या विकासाला नवे होणारे महामार्ग चालना देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रातील अनेक रस्ते जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यासाठी हजारो कोटी रूपये देण्याचे काम गडकरी यांनी केले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते 96.78 कि. मी. लांबीच्या दोन महामार्ग प्रकल्पांचे डिजीटल पध्दतीने लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात राष्ट्रीय महामार्गाचे रिजनल मॅनेंजर अंशुमन श्रीवास्तव म्हणाले, लोकार्पण करण्यात आलेल्या बोरगाव – वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 कि.मी. 224/000 ते कि.मी. 276/000 लांबीचे चौपदरीकरण करणे (पॅकेज क्र. २) या कामाची लांबी 52 कि.मी. असून किंमत 2 हजार 76 कोटी 63 लाख व महामार्ग क्र. 965 जी सांगोला – सोनंद – जत साखळी क्र. कि.मी. 0.000 ते 44.784 मध्ये पुर्नवसन व उन्नतीकरण करणे या कामाची लांबी 44.78 कि.मी असून किंमत 257 कोटी 38 लाख रूपये इतकी आहे. अशी या दोन्ही प्रकल्पाची एकूण 96.78 इतकी लांबी असून ‍किंमत 2 हजार 334 कोटी रूपये इतकी आहे. यामुळे सांगली जिल्ह्याच्या दळणवळणाला चालना मिळेल तसेच सोलापूर – सांगली प्रवासाचा वेळ कमी होईल, असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश ‘-जलसंपदामंत्री जयंत पाटील

News Desk

वर्षा राऊत यांना नव्याने ईडीचे समन्स!

News Desk

#Coronavirus : ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit