HW Marathi
महाराष्ट्र

महामित्र अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे निघाले सरकारच्या अब्रुचे धिंडवडे

पी. रामदास  | राज्य सरकारच्या सोशल मीडिया महामित्र योजनेत सद्दाम हुसैन, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहभाग

स्पर्धा 25 फेब्रुवारीला संपली तरी मिळते मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल सहीचे प्रमाणपत्र
 मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यात 1 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र अ‍ॅप’मधील तांत्रिक त्रुटींमुळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांचे मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इराकचे दिवंगत अध्यक्ष सद्दाम हुसैन इतकेच नव्हे तर थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम या सर्वांना मिळू लागले आहे. या सर्व जणांची नावे नोंद केल्यावर राज्य सरकारच्या ‘महामित्र डॉट इन’ या वेबसाईटवर त्वरित हे प्रमाणपत्र मिळत आहे. या प्रकारामुळे जीव तोडून मेहनत करून या स्पर्धेत सहभागी झालेल्या व राज्यस्तरावर निवड झालेल्या महामित्रांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
  • महामित्र नेमके काय
आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनाचा विधायक उपयोग करून घेण्यासाठी व तरूणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम सरकारने सुरू केला होता. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी वयाची 15 वर्षे पूर्ण होणे आवश्यक होते. तसेच स्पर्धक महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे अनिवार्य होते.
नोंदणी साठी 1 ते 25 फेब्रुवारी पर्यंतची मुदत होती. 5 मार्च ते 17 मार्च दरम्यान जिल्हास्तरावरील गटचर्चा झाली त्यानंतर 24 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये अंतिम कार्यक्रम झाला. राज्य स्तरावर निवड होण्यासाठी स्पर्धकांना अनेक सोशल मीडियामध्ये किती सक्रिय आहेत याचा पुरावा द्यावा लागला होता.
विविध सोशल साईटवर सक्रिय असलेल्यांना 10 गुण, मोबाईलमध्ये किती संपर्क क्रमांक आहेत त्यावर आधारित 15 गुण, किती संदेश पाठवले व स्वीकारले त्याला 10 गुण, सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या 5 ग्रुपसाठी 5 गुण, सोशल मीडियाचे महत्त्व सांगणार्‍या लेखासाठी 10 गुण, विधायक संदेश शेअर करण्यासाठी 15 गुण, गट चर्चेसाठी 15 गुण व मतदानासाठी 20 गुण अशा एकूण 100 गुणांपैकी जास्त गुण मिळवलेल्या व जिल्हा स्तरावरील गटचर्चेमध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांना राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवडण्यात आले होते.

 

  • मुदत उलटल्यानंतरही प्रमाणपत्र 
25 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत उलटून गेली आहे. मात्र शुक्रवार 30 मार्च पर्यंत नव्याने अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामध्ये रजिस्टर केल्यावर कोणत्याही माहितीची खातरजमा न करता व कोणताही पासवर्ड न विचारता शुन्य गुण मिळालेल्या व्यक्तींना देखील त्यांनी दिलेल्या नावाप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळत आहे आहे. महामित्र अ‍ॅपमधील या तांत्रिक बिघाडामुळे सरकारच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहे.
स्पर्धकाने दिलेली माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे पडताळून पाहिल्यानंतर गुण देण्यात आले होते. अ‍ॅप डाऊनलोड करताना बेसिक माहितीमध्ये नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जिल्हा, तालुका व क्षेत्र या सर्वासोबत पिन कोड क्रमांक याबाबत माहिती मागितली जाते मात्र यापैकी कोणत्याही बाबीची खातरजमा केली जात नसल्याचे या प्रमाणपत्रांवरुन समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे प्रमाणपत्र कोणतीही खातरजमा केल्याशिवाय मिळणे ही अतिशय गंभीर बाब असून ऑनलाईन सुरक्षेबाबत गंभीर असलेल्या सरकारच्या अधिकृत विभागातर्फे ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
  • या माहितीनंतर वेबसाईट बंद
याबाबत माहिती व जनसंपर्क खात्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत अवगत केल्यानंतर 30 मार्च रोजी रात्री पावणे नऊ वाजता महामित्र वेबसाईट बंद करण्यात आली. या वेबसाईटचे काम पाहणार्‍या संस्थेच्या तांत्रिक टीमशी संपर्क साधून ही त्रुटी दूर करण्यात येईल, असे महासंचालनालयातर्फे सांगण्यात आले. मात्र  अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंतचा व्हिडिओ 30 मार्च रोजी रात्री सव्वा आठ वाजता तयार केला आहे. त्यामुळे मॉर्फिंग करून प्रमाणपत्र मिळवले जात असल्याचा खुलासा तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • राज्यस्तरावर उपस्थितांना प्रवासभत्ता 
या स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांना प्रवासभत्ता, महामित्रची बॅग, पेन ड्राईव्ह देण्यात आले होते. मुंबई, ठाणे परिसरातील स्पर्धकांना 500 रूपये तर नागपूर सारख्या लांब ठिकाणाहून आलेल्यांना 1500 रूपये देण्यात आले होते.
महामित्र स्पर्धा समाप्त झाली आहे. स्पर्धेमध्ये कोणी सहभाग घेतला होता त्याची नोंद आमच्याकडे आहे. स्पर्धेनंतर कोणीही चुकीची प्रमाणपत्रे घेऊ शकत नाही. आम्ही प्रमाणपत्रे देताना अधिकृत यादीत असलेल्या सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देणार आहोत.
  • ब्रिजेश सिंह, महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर क्राईम
  • महामित्र स्पर्धेसाठी आम्ही तयार केलेले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फुलप्रुफ आहे. काही जण प्रमाणपत्राचे छायाचित्र घेऊन त्यावर मॉर्फिंग करत असतील. त्यामुळे अशी प्रमाणपत्रे घेतली जात आहेत. हा चुकीचा प्रकार आहे.
  • अजय अंबेकर, संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र

Related posts

‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’,आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

rasika shinde

काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या परिवारापुरते चालणारे पक्ष आहेत !

News Desk

मापात पाप करणारे सात पंप जप्त

News Desk