HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या !

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपले सरकार आहे.  त्यामुळे आपल्याला जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणासह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (१७ फेब्रुवारी) केले.

गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.  त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री ॲड अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

कोकणातील समुद्राची व्याख्या स्वच्छ आणि नितळ या शब्दांत करत या मातीतील माणसेही कोकणातील समुद्रासारखी नितळ आहेत. तसेच कोकणाचा विकास करताना निधी कमी पडू न देणार असल्याचे आश्वासनही यावेळेस उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच कोणत्याही ठिकाणाचा विकास करत असताना तिथे स्वच्छता असायलाच हवी. आपण आपल्या देवस्थांनाना देखील मंगलमय ठेवले पाहिजे म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंगलमूर्तीचे दर्शन झाल्याचे समाधान खऱ्या अर्थाने होईल असेही मुख्यमंत्र्यांनी मत मांडले. या शिवाय ‘गणपतीपुळ्याला  मी यापूर्वीही आलो आहे पण माझ्या दृष्टीने माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्वजण माझ्यासाठी गणराय आहात आणि तुमच्याच आर्शिवादाने मला हे पद मिळाले’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लोकांचे आभार मानले.

भूमिपूजनाच्या सोहळ्यापुर्वी उध्दव ठाकरेंनी सहकारी मंत्री व पदाधिकाऱ्यांसह गणपतीचे दर्शन घेतले.  त्यानंतर त्यांच्या हस्ते मंदिर परिसर विकासाचे भूमीपूजन आणि कोनशिलाचे अनावरण झाले. दरम्यान, आराखड्याच्या मुख्य भूमीपूजनाचा सोहळा आठवडा बाजारालगत असलेल्या रस्त्याच्या कामाने झाला.   

मंदिर परिसर विकासाचा असा आहे आराखडा…

टप्पा क्र. १ 

  1. गणपतीपुळे गणपती मंदिराचे तसेच परिसर संबंधित आराखडयातील कामे
  2. गणपतीपुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे
  3. पाणीपुरवठा योजना व स्वच्छता संदर्भातील कामे
  4. अधिक क्षमतेचे सार्वजनिक स्नानगृह व शौचालय बांधणे
  5. पर्यटक व भाविकांना समुद्र स्नानाकरिता, सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यावरजागा आरक्षित करुन बोयेज टाकणे

टप्पा क्र.२

  1. सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन
  2. वाहनतळ सौर ऊर्जा संकरीत कामे

टप्पा क्र.३

गणपतीपुळे या गावातील व परिसरातील रस्ते, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

 

Related posts

जाणून घ्या… सुब्रमण्यम स्वामींच्या ‘मातोश्री’ भेटीमागचे कारण

News Desk

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

News Desk

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk