कोल्हापूर | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीही राखता आल्यान नाहीत. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. जसं आघाडी सरकारच्या नेत्यांनी म्हटले होते की त्यांची सत्ता कायम राहणार तसेच चित्र निवडणुकीचे निकाल पाहून दिसत आहे.
कोल्हापुरातील खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं मूळगाव आहे. पण खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे. शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातच पराभूत केल्याने पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने भाजपला नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही बोललं जात आहे.
नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या २० वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत.
राणेंना धक्का
भाजपला आणि आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे. कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतचा पहिला निकाल हाती आला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीत 7 पैकी 4 जागा बिनविरोध निवडून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. तसेच कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे व गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ असून राणेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.