मुंबई | “कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. या स्थितीतही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत एकट्या जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे”, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात एकूण ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
“बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते”, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरु
“कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते जून या ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले तर जुलै महिन्यात ३१ मेळावे झाले. जुलैमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये २०४ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १९ हजार ७८ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १८ हजार १५३ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ६५१ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत”, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
“येत्या काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी”, असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.