HW News Marathi
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली

त्नागिरी | चिपळूण शहरात काल (२२ जुलै) अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे.

चिपळूण शहरात २०२ मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये २००५ पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

पूरग्रस्तांना मदतीमध्ये अडचणी

चिपळूण शहरातील पूरस्थिती ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. रात्री पाण्याचा वेग खूप असल्याने मदत कार्य करता आले नाही, तर काल दिवसभर चिपळूण शहरात पूरस्थिती होती. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्रस्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी काल दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नव्हते.

चिपळूणमध्ये भीषण परिस्थिती

पुढील काही तास पावसाचा जोर ओसरला, तर चिपळुणातील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरल्याने अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेली.

याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो नागरिक पाण्यात अडकले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला

News Desk

‘पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईलाही सेल्फीचा मोह’,फोटो सोशल मीडियात व्हायरल!

News Desk

छायाचित्रकार हा पोलिसांचा तिसरा डोळा – पो. नि. पडवळ 

News Desk