HW News Marathi
महाराष्ट्र

कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात !

औरंगाबाद | देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या लढाईला जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असून सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (१९ एप्रिल) येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात तसेच कायदा-सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्य फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार इम्तियाज जलील, भागवत कराड, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, प्रशांत बंब,अतुल सावे, प्रदिप जैस्वाल, विक्रम काळे, अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेऊन गृहमंत्री म्हणाले की, आपल्याला सर्व यंत्रणांच्या, लोकप्रतिनिधींच्या आणि जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे. त्या दृष्टीने लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी समन्वयातून आपापल्या परीने या लढाईत योगदान द्यावे. यामध्ये गर्दी टाळणे, संचारबंदी नियमांचे पालन होणे सर्वाधिक गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना फळे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळे खरेदी करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी योग्य नियोजन करावे. तसेच गरजूंना रेशन दुकानांवर सुलभतेने सुरळीतरित्या धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात. त्यादृष्टीने गावांमध्ये दवंडी द्वारे रेशन नियतनाबाबत माहिती द्यावी. तसेच रेशनकार्डधारक नसलेल्या लोकांना धान्य देण्यासाठी उद्योग समूहांच्या सीएसआर निधीतून सहाय्य उपलब्ध करून देता येईल का याची विचारणा करून उद्योगसमूहांकडून निधी मिळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांची मदत घेत तपासणी करावी. संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश गृहमंत्री यांनी यावेळी संबंधितांना दिले. ग्रामीण भागात खाजगी दवाखाने बंद असून ते सुरु करणे गरजेचे आहेत, असे फलोत्पादन मंत्री भुमरे म्हणाले. लॉकडाऊनमुळे ऊसतोड कामगार, विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. तसेच रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत फळ विक्रीची योग्य व्यवस्था करण्याचे नियोजन करण्याची सूचना खा.जलील यांनी केली.

कोरोनासोबत सारी या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याकडे ही लक्ष द्यावे लागणार आहे. शहरात अनेक दानशूर व्यक्ती मदत करतात ती मदत संकलित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करावी, अशा सूचना खा.कराड यांनी केल्या. सर्वतोपरी सहकार्य करुन शहराला रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. गर्दी टाळण्यासाठी उपाय अधिक प्रमाणात राबवले गेले पाहिजे, असे आ.जैस्वाल म्हणाले. जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी अधिक कडक करण्याची गरज आहे. दुधाचा भाव कमी झाला आहे. शेतकरी या सगळ्या काळात अडचणीत आला असून अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण भागातील जनता, गरजू यांच्यापर्यंत रेशन इतर सुविधा पोहोचल्या पाहिजे असे आ.बागडे, आ.दानवे यांनी सांगितले. आ.बंब यांनी घरपोच भाजीपाला देण्याची पद्धत सुरु करावी तसेच लिलावाची वेळ ठरवावी असे सांगितले. लोकप्रतिनीधींच्या नियमित बैठका व्हाव्यात असे आ‌. काळे यांनी सांगितले. कोटा येथील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आ.चव्हाण म्हणाले त्यावर मंत्रीमंडळात चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे गृहमंत्री म्हणाले. रेशनदुकान तसेच बॅंकामध्ये जास्त प्रमाणात गर्दी होत आहे ती रोखली पाहिजे अशी सूचना आ.सावे यांनी केली. संचारबंदीमुळे अनेकजण अडकून पडले असल्याचे आ.शिरसाठ यांनी यावेळी सांगितले. सर्व सूचनांनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हॅास्पिटलमधूनही पवारांची राज्य आणि देशावर बारीक नजर’ संजय राऊतांनी घेतली पवारांची भेट

News Desk

३०० कोटींचा मालक ५-६ कोटींसाठी आत्महत्या करतो? हे पटण्यासारंखं नाही – निलेश राणे

News Desk

आघाडीचे सरकार अंतर्विरोधामूळेच पडले, चंद्रकांत पाटलांचा दावा

News Desk