मुंबई | “राज्यात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे लोकांच्या मनात घर करीत आहेत. त्यांच्या या यात्रेला मिळणार उस्फुर्त प्रतिसाद पाहता मला आदित्य ठाकरेंमध्ये तरुण बाळासाहेब दिसतात”, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आगामी विधानसभेच्या निमित्ताने राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांच्या यात्रा सुरु आहेत. त्याचप्रमाणे, शिवसेनेच्या जनाशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सध्या आदित्य ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करत लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र, शिवसेनेची ही यात्रा राजकीय हेतूसाठी नसल्याचा दावा आदित्य ठाकरेंकडून केला जात आहे.
“बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा राज्यभरात आपल्या सभा घ्यायचे तेव्हा त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी असायची. तशीच गर्दी आज आदित्य ठाकरे यांच्या सभांना उसळते आहे. म्हणूनच मला आदित्य ठाकरेंमध्ये तरुण बाळासाहेब दिसतात”, अशा शब्दात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता या चर्चा खऱ्या ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ निश्चित झाला असून कार्यकर्त्यांना देखील याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातूनच लढणार असून अनिल परब यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना त्यासाठीच्या तयारीला सुरुवात करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. असे झाले तर आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे पहिलेच सदस्य ठरतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.