HW News Marathi
महाराष्ट्र

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शंभर शाळा डिजिटल आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प

कणकवली | देवगड-वैभववाडी मतदार संघातील पहिल्या शंभर शाळा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल करण्याचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी कणकवली येथे केला जाणार आहे. या कार्यक्रमानंतर टाटा ट्रस्टने विकासासाठी दत्तक घेतलेल्या वाभवे-वैभववाडी शहराच्या पाणी शुद्धीकरणाचा शुभारंभही होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली भगवती मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती आ.नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय निधी अभावी मतदार संघातील विकासकामे रखडली जाणार नाहीत असा यापुर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे आ.नितेश राणे यांनी आपल्या कामांचा धडाका सुरु केला आहे.

आ.नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या शंभर शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत. त्यांचे प्रतिनिधी, व्यवस्थापक समिती, शिक्षक यांना याबाबतची कल्पना दिलेली असून त्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले. यानिमित्ताने टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून शाळा कशा प्रकारे डिजिटल केल्या जातील, त्याची एकूण प्रक्रिया कशी असेल याबाबतची माहिती दिली जाणार आहे. वाभवे-वैभववाडी शहराच्या विकासाची जबाबदारी टाटा ट्रस्टने घेतली आहे. या शहरात पाणी शुद्धीकरणाचा जो प्रकल्प राबविला जात आहे. त्याबाबतचा शुभारंभही शाळा डिजिटल कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर होणार आहे.

  • टाटा ट्रस्टची बालोद्यानला मान्यता

देवगड शहरातील बालोद्यान विकसित करण्याची मान्यता टाटा ट्रस्टने दिलेली आहे. देवगड शहरात हे बालोद्यान टाटाकडून जेव्हा उभे राहिल तेव्हा शहराच्या सौंदर्यातही भर पडेल आणि मुलांना खेळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. टाटा ट्रस्टने आपला प्रस्ताव मान्य केल्याबद्दल आ. नितेश राणे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

  • यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षणाचा शुभारंभ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलामुलींना एमपीएससी आणि युपीएससीचे मार्गदर्शन सिंधुदुर्गातच व्हावे यासाठी राज्यातील प्रतिथयश प्रशिक्षण देणा-या युनिक अ‍ॅकॅडमीचे मार्गदर्शन ४ फेब्रुवारी रोजी ११ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील मुलामुलींना गोवा,कोल्हापूर, पुणे येथे जावे लागते याचा विचार करुन ही प्रशिक्षणाची सुविधा कायमस्वरुपी उपलब्ध करून देण्याचा आपला विचार आहे. युनिक अ‍ॅकॅडमीची शाखा याठिकाणी सुरु करुन सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह महाडपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यात सामावून घेण्याच आपला मानस आहे.

जेणेकरून युपीएससी आणि एमपीएससीच्या स्पर्धा परिक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेषत: कोकणातून सनदी अधिकारी बनतील. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्राचा पगडा भारी आहे. त्याचप्रमाणे कोकणचाही पगडा वाढावा. ही इच्छा मनात ठेऊन हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आ.नितेश राणे यांनी दिली. या प्रशिक्षणाचा शुभारंभही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मार्गदर्शनासाठी युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक डॉ.तुकाराम जाधव, प्रा.प्रविण चव्हाण, डॉ.अमित आहिरे, प्रा. देवा जाधवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती युनिक अ‍ॅकॅडमी समन्वयक अमोल गवळी यांनी दिली. ते म्हणाले, ‘डॉ.तुकाराम जाधव हे गेली २० वर्षे युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. दिल्ली आणि पुणे येथे त्यांचे क्लास चालत असून राज्यशास्त्र, जनरल सायन्स या विषयांवरती ते स्वत: मार्गदर्शन करतात. उर्वरित मार्गदर्शन इतर प्रशिक्षक करणार आहेत. आ.नितेश राणेंच्या माध्यमातून हे वर्ग कायमस्वरुपी याठिकाणी चालू ठेवण्याचाही आपला मानस आहे. मागणी लक्षात घेऊन पुर्णवेळ अ‍ॅकॅडमीची शाखा याठिकाणी सुरु केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 2)

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

Aprna

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधानांनी दाखवले !

News Desk