मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना कठोर शब्दांत फटकारल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर, आज (१४ ऑगस्ट) मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अदिती तटकरे हे उपस्थित होते. नुकतीच राष्ट्रवादीची ही बैठक संपली असून या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत धनंजय मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवारांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अजित पवार नाराज असण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. आजच्या बैठकीत तो विषयच नव्हता. आमची आपल्यापल्या विभागाची कामे सुरु आहेत. मी स्पष्ट सांगतो कोणीही नाराज असण्याचा काहीही विषय नाही”, असे म्हणत धनंजय मुंडेंनी अजित पवार आणि पार्थ पवारांच्या नाराजीचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.”सामाजिक न्याय विभागाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. न्याय विभागाच्या काही आश्रमशाळा, दिव्यांगांचे काही प्रश्न आणि सामाजिक न्याय विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे ४ महिन्यांचे पगार थकीत राहिलेले आहेत”, असेही धनंजय मुंडेंनी पुढे स्पष्ट केले आहे.
सुनील तटकरे यांनी देखील बैठक संपल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी “पार्थ पवार आणि अजित पवारांबाबत आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसे काहीच कारण नाही सामाजिक न्याय विभागाच्या प्रश्नांवर आज चर्चा झाली. अजित पवार बिलकुल नाराज नाहीत. अजित पवार सध्या पुण्यात आपल्या कामात व्यस्त आहेत. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे”, असे खासदार सुनील तटकरेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.