HW News Marathi
महाराष्ट्र

‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

मुंबई | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (jai jai maharashtra maza) हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत (Maharashtra State Anthem) म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते. सध्या प्रचलित असलेल्या या गीतातील दोन चरण मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करून ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात येत आहे. हे गीत 1.41 मिनिटे वाजविता / गाता येईल.

राज्यगीताचे गायन/वादन करण्याबाबत शासनाने राष्ट्रगीताप्रमाणे नियमावली तयार केली आहे. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन /वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

वाद्यसंगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे हे पुढीलप्रमाणे राज्यगीत असेल:-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥1॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2॥

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तत्कालीन फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे”, हसन मुश्रिफांचं विधान

News Desk

Goodbye 2021 : ‘या’ नेत्यांना वर्षभरात आली ईडीची नोटीस

Manasi Devkar

जालन्यात रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती, दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित

News Desk