HW News Marathi
महाराष्ट्र

संदीप क्षीरसागरांचे खंदे समर्थक जयदत्त क्षीरसागरांच्या उपस्थितीत आज हातात शिवबंधन बांधणार

बीड | बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या अगोदर बीड शहरात शिवसेनेने अनोखी पोस्टरबाजी करत, बीडमधील राष्ट्रवादीला घायाळ केलंय. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा हे पाच जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत प्रवेश करणार म्हटल्याबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र उस्फूर्तपणे बॅनर लावले आहेत. असं नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी सांगितले. बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर सेवकांच्या गटाचे प्रमुख फारुख पटेल यांची आक्रमक विरोधक म्हणून बीड नगरपालिकेमध्ये ओळख आहे. त्याचबरोबर अमर नाईकवाडे यांचा देखील आक्रमक चेहरा आहे.

यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे यांनी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून 2019 निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आता आमदार झाल्यानंतर मिळणारी वागणूक यामुळे, पाचही शिलेदार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराज आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता हातात शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत आहे. बीड नगरपालिकेतील विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये कायम बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, आता ते भारतभूषण क्षीरसागर यांच्याचं नेतृत्वात काम करण्यासाठी शिवबंधन हाती बांधणार आहेत.

मागच्या अनेक दिवसांपासून ज्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते, ते एकेकाळचे राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या विजयातील बिनीचे शिलेदार आज शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मागच्या वर्ष दिड वर्षांपासून तसे ते आ. संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावले होतेच, आता मात्र ते थेट सेनेत प्रवेश करीत आहेत. या प्रवेशामुळे जिथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे , त्याचवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि पर्यायायाने बीड नगरपालिकेसाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांची शक्ती वाढणार आहे. आजचा प्रवेश खर्‍याअर्थाने बीडच्या राजकारणाची दिशा बदलणारा असेल.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे चुलते असणारे शिवसेनेचे तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात आ. संदीप क्षीरसागर जायंट किलर ठरले होते. संदीप क्षीरसागर यांच्याकडे त्यावेळी फारशी यंत्रणाही नव्हती आणि मोठ्या संस्थांचे जाळेही नव्हते, तरीही त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला, त्यामागे त्यांना बीड शहरातून मिळालेले प्रचंड मताधिक्य , आणि ग्रामीण भागात जयदत्त क्षीरसागर यांचा वारू रोखण्याचे संदीप क्षीरसागर यांच्या बिनीच्या शिलेदारांनी केलेले प्रयत्न हेच कारण होते. त्यावेळी काकू नाना आघाडीचा भाग असलेले पण संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राष्ट्रवादीत असलेल्या कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रवादीत नसलेल्या लोढा कुटुंबाने देखील आ. संदीप क्षीरसागर यांचीच कुमक केली होती. बीड शहरातून अमर नाईकवाडे , फारूक पटेल, बाळासाहेब गुंजाळ , बाबूशेठ लोढा, दिनेश मुंदडा यांच्यासोबतच ग्रामीण भागातून गंगाधर घुमरे , बबनराव गवते, मदन जाधव या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच नितीन लोढा यांनीही संदीप क्षीरसागर यांच्यासाठी खिंड लढविली होती. यातील बाळासाहेब गुंजाळ आणि काही नगरसेवकांनी यापूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. तर आज गंगाधर घुमरे, अमर नाईकवाडे, फारूक पटेल राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जात आहेत. तर बाबूशेठ लोढा आणि नितीन लोढा हे देखील शिवसेनेत जात आहेत. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर आ. संदीप क्षीरसागर यांना जितके मताधिक्य होते, त्याच्या कितीतरी पट अधिक शक्ती या सर्वांची आहे, आणि ती शक्ती आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना जोडली जात आहे.

बीड शहरात डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना सातत्याने आव्हान देण्याची भूमिका आ. संदीप क्षीरसागर यांच्यासाठी अमर नाईकवाडे आणि फारूक पटेल यांनी घेतली होती. तर ग्रामीण भागात गंगाधर घुमरे यांनी आक्रमकपणाने खिंड लढविली होती. मात्र मागच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीत आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे हेच लोक उपेक्षित राहिले. म्हणूनच आता या लोकांचे शिवसेनेत जाणे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. मागच्या काळात या बंडखोर कार्यकर्त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आग्रही होते, त्यांनी आपल्यापरीने त्यासाठी प्रयत्नही केले होते , मात्र जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसारखीच पक्षातील नेतृत्वाची ‘घडी ‘ देखील विस्कटू लागल्याने बीड विधानसभा मतदारसंघापासून धनंजय मुंडे यांनी स्वतःला अलिप्त केले आहे . तर त्यासोबतच शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात जयदत्त क्षीरसागर यांनी अनिल जगताप यांची पाठराखण करून त्यांना जिल्हाप्रमुख करण्यात मोठी भूमिका निभावल्याने त्याच्याकडे आक्रमक चेहरा आला आहे. आता मागच्या दिड वर्षांपासून राष्ट्रवादीत उपेक्षित असणारे घुमरे, नाईकवाडे, पटेल हे नेते जर शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षात गेले असते तर राष्ट्रवादीला तितकासा फरक कदाचित पडला नसता, मात्र यांची ताकत शिवसेनेला मिळणे , पर्यायाने जयदत्त क्षीरसागर यांची शक्ती वाढली आहे. ही राष्ट्रवादीसाठी येणार्‍या नगरपालिका आणि जिल्हापरिषद, पंचायतसमिती निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळेच आजच्या प्रवेशाने बीडच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आघाडीमध्ये दुफळीचे चित्र दाखवत आहे – रोहित पवार

News Desk

पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा! – मुख्यमंत्री

Aprna

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ७४ कोटींची तरतूद केल्याबद्दल मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

News Desk