नागपूर | विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पूर्व विदर्भात शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे जेईई आणि नीटसाठी तयारी केलेल्या १७ हजार विद्यार्थ्यांसमोर परीक्षा देण्याचा प्रश्न निर्माण झाला. याची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल (३१ ऑगस्ट) घेतली. न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेत या पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा राज्य व केंद्र सरकारला केली होती. यावर आज (१ सप्टेंबर) सुनावणी घेण्यात आली.
जिल्हा दंडाधिकारी यांना परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार नसून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) हीच योग्य संस्था असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. संपूर्ण परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं. पूराचा फटका बसणारे विद्यार्थी परीक्षा पुन्हा घेण्याची विनंती करु शकतात. पण ठरल्याप्रमाणे परीक्षा पार पडायल्या हव्यात असं न्यायालयाने म्हटलं आहे. प्रवासात अडचण असल्याने परीक्षेसाठी हजर राहू न शकणारे विद्यार्थी सादरीकरण करु शकतात.
विदर्भातील काही भागात पूर आल्यामुळे आजपासून सुरु होणारी JEE आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. पूरग्रस्त भागातील विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा येथे पुरामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली होती.