HW News Marathi
Covid-19

फक्त राजकारण आणि महाराष्ट्र द्रोह | जितेंद्र आव्हाड

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देशासह राज्याच्या भयानक परिस्थितीवर भाष्य केले आहे. आणि लॉकडाऊनमुळे लोक बेरोजगार झाले असून नुकसान यांची भीती आणि चिंता वाटली आहे. विरोधकांचे राज्य सरकारवर टीका यासारख्या अनेक मुद्द्यावर आव्हाडांनी भाष्य केले आहे. तसेच आव्हाडांनी राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५० हजाराचा आकडा ओलांडला आहे, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे

मुंबईसंदर्भात बोलताना आव्हाड म्हणतात, देशातील कोरोना रुग्णांची संख्याही मुंबईमध्ये आहे. यावर बोलताना आव्हाडांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “मुंबईत झालेल्या कामाचे कौतुक देशातील केंद्राच्या २ नामांकित संस्थांनी केले आहे व मुंबईचे कामाचे मॉडेल देशभरात राबवावे असे म्हटले आहे आणि गुजरात उच्चन्यायालय म्हटले की गुजरातच्या हॉस्पिटल ची परिस्थिती काळ कोठडी पेक्षा भयंकर आहे. गुजरात च्या मुख्यमंत्र्यांचे नाव व्हेंटिलेटर भ्रष्टाचार प्रकरणात घेतले जाते तरी हे सगळे आमच्या वर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना दिसत नाही. डोळ्यावर पट्टी बांधलेल्याना कसे दिसणार हे सगळे कारण त्यांना करायचे आहे फक्त राजकारण आणि हा #महाराष्ट्र_द्रोह आहे.”

 

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट

काही मूलभूत गोष्टी आधी समजून घ्या. लॉकडाउनला दोन महिने उलटून गेले तरी देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे, याचा अर्थ हा एक प्रचंड वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे.शिवाय, लागण झालेल्यांपैकी जेमतेम २.५ टक्के लोक यात मरण पावत आहेत. ९७ ते ९८ टक्के लोक पूर्ण बरे होऊन घरी जातायत. भारतात टीबी, मलेरिया, अतिसार, किंवा कुपोषणामुळे मरणाऱ्यांची संख्या यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. तसे असेल तर आपण या रोगाचा अकारण धसका घेतला आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.

मी कोरोनातून बरा होऊन घरी आलो म्हणून आता हे ज्ञान पाजळतोय अशी शंका कुणालाही येणे स्वाभाविक आहे. मी फाजील आत्मविश्वासात राहिलो. आपण आता पन्नाशी ओलांडली आहे. पंचविशीतले नाही, याचा अतिउत्साहात मला विसर पडला. राजकारणातील धकाधकीमुळे वेळेवर खाणे नाही, पुरेशी झोप नाही, व्यायामाची सवय मोडलेली, यामुळे माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे हे मी ओळखायला हवे होते. सबब, हे ज्ञान पाजळणे नाही तर मी केलेले परीक्षण आहे.

इटलीत लॉकडाऊन फसला तो तिथल्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे. त्यांना लॉकडाऊन ही सुट्टी वाटली आणि ते मौजमजा करायला बाहेर पडले. इतका टिचभर देश असूनही इटली कोरोनाच्या विळख्यात सापडला. भारतासारख्या आकाराने आणि लोकसंख्येने अतिविशाल देशात तो यशस्वी होईल का याचा पूर्ण विचार नाट्यमय घोषणा करण्याची हौस असलेल्या पंतप्रधानांनी करायला हवा होता. हातात दमडी नाही, काम नाही, अन्न नाही, निवारा नाही, अशा अवस्थेत आपापल्या घरापासून हजारो मैल दूर पोटासाठी गेलेल्या मजुरांचे काय भयानक हाल झाले, होतायत, हे आपण पाहतो आहोत. मोडकळून पडलेल्या संसाराचे अवशेष डोक्यावर घेऊन चालणारे त्यांचे तांडे, वाटेतल्या प्रत्येक राज्याच्या सीमेवर होणारी त्यांची अडवणूक, रुळावरून भरकटलेल्या त्यांच्या रेल्वे गाड्या, प्रवासाचे दिवस वाढल्यामुळे अन्नावाचून मरणारे त्यांचे लहानगे, हा सारा आतडी पिळवटणारा प्रकार आहे.

तीन आठवड्यांपूर्वी स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मायकल लेविट म्हणाले की कोरोनापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या) लॉकडाउनमुळे मरतील. गावात पोट भरत नाही म्हणून ही माणसे शहरांत आली. परत गावी जाऊन ते कसे पोट भरणार? धरून चालू की आज ना उद्या कोरोनाची साथ ओसरेल. पण मरणशय्येवर पडलेली अर्थव्यवस्था त्यांना पुन्हा शहरात नोकऱ्या देईल? शहरी मध्यमवर्गाचा स्वार्थी, भावनाशून्य चेहरा पाहिलेले कितीजण परत यायला धजावतील? हे साधे प्रश्न जरी स्वतःला विचारले तरी किती भयावह आर्थिक आणि सामाजिक स्थितेतरे यापुढे होणार आहेत याची कल्पना येते आणि प्रा. लेविट यांना नेमके काय म्हणायचे आहे हे लक्षात येते. भक्तगणांना हार्वर्डच्या ऐवजी हार्ड वर्क आवडते. आता तर ते आत्मनिर्भर व्हायला निघालेत. त्यामुळे मायकल लेविट काय म्हणतायत ते त्यांच्या गळी उतरणार नाही. त्यांना लोकलच्या बाबतीत व्होकल व्हायचा आदेश मिळाला आहे. तसे असेल तर त्यांनी उद्योगपती राजीव बजाज लॉकडाऊनच्या बाबतीत काय म्हणाले ते जरा ऐकावे. बजाज तर लोकलच आहेत ना?

हे सारे सांगण्याचा हेतू इतकाच की आता आपली आयुष्ये हळूहळू पूर्वपदावर आणायला हवीत. एखाद्या धोकादायक आजारापासून स्वतःची काळजी घेणे आणि त्याची दहशत घेऊन कड्याकुलपात दिवाभीतासारखे बसून राहणे यात फरक आहे. दोन वेळा भाकरतुकडा ताटात पडण्यासाठी त्या मजुरांना आज जी शर्थ करावी लागणार आहे, ती वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. आज शक्यता आहे की तुमच्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली सुद्धा असेल. पण काहीच लक्षणे दिसत नाहीत म्हणजे तुमच्या शारीरिक प्रतिकारशक्तीने त्यावर मात केली आहे. ज्याला “अँटीबॉडीज” म्हणतात त्या तुमच्या शरीरात तयार झाल्या असतील. अशातूनच आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याला हर्ड इम्यूनिटी (समूहाची प्रतिकारशक्ती) म्हणतात ती तयार होते. आपल्याकडे ६० टक्के लोकसंख्येचे सरासरी वय चाळिशीच्या आत आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि ताप नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला दोनतीन आठवडे एकांतवासात ठेवलात तरी आरामात बरे व्हाल. काळजी घ्या, भीती बाळगू नका. मानसिक ताण नसेल तर शरीरही साथ देते. नाहीतर माझ्यासारखी हॉस्पिटलमध्ये पडण्याची पाळी येते.

पुन्हा एकदा सांगतो, कोरोना झालेले ९७ ते ९८ टक्के लोक पूर्णतः बरे होत आहेत. तुमची प्रतिकारशक्ती हाच त्यावर एकमेव उपाय आहे. कोरोनाविषयक सध्या येणाऱ्या तमाम बातम्यांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राची अवस्था फार बिकट असल्याचे सतत सांगितले जात आहे. हे तद्दन खोटे असून मुंबईला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे, असा स्पष्ट आरोप मी आज करतोय. तिचे अनन्यसाधारण आर्थिक महत्त्व डोळ्यात खुपणारे, ती आपल्याला मिळाली नाही म्हणून तिच्या वाईटावर टपून बसलेले कोण लोक आहेत हे मी नाव घेऊन सांगायची गरज नाही. मुलीने प्रेमप्रस्ताव नाकारला की तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणारे आणि आज मुंबईतील कोरोनाच्या खोट्या बातम्या पसरवणारे एकाच जातीचे आहेत. मी तर म्हणेन एकदा होऊनच जाऊदे मुंबई आणि अहमदाबादमधील कोरोनाची तटस्थ पथकांकडून तपासणी. येऊ द्या खरी आकडेवारी बाहेर. ‘नमस्ते ट्रम्प’ इव्हेंटसाठी दीड लाख लोक एकत्र गोळा झाल्यामुळे तिथे आज कोरोनाचा काय नंगानाच सुरु आहे हे जगाला आता कळायलाच हवे. साथ आटोक्यात येण्याची काही चिन्हे सोडा, थेट मुख्यमंत्री विजय रुपानींचे नाव गुंतलेले व्हेंटिलेटर भ्रष्टाचार प्रकरण घडून सुद्धा गेले.

तुलनेने, आहे त्या तुटपुंज्या पैशात उद्धव ठाकरे धीरोदात्तपणे काम करत आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही म्हणणारे तोंडावर आपटले आहेत. आणि त्यांचा राजीनामा मागता? अहो, कोरोना प्रत्येक देशात घुसला. मग काय इटली, फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांचा, बोरिस जॉन्सन आणि ट्रम्प यांचासुद्धा राजीनामा मागायचा का? महाराष्ट्र भारतातच आहे ना? मग नरेंद्र मोदींचा राजीनामा का नको? पण आम्हाला राजकारण करायचे नाही कारण मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आम्ही नाही

मुंबईत झालेल्या कामाचे कौतुक देशातील केंद्राच्या २ नामांकित संस्थांनी केले आहे व मुंबईचे कामाचे मॉडेल देशभरात राबवावे असे म्हटले आहे आणि गुजरात उच्चन्यायालय म्हटले की गुजरातच्या हॉस्पिटल ची परिस्थिती काळ कोठडी पेक्षा भयंकर आहे. गुजरात च्या मुख्यमंत्र्यांचे नाव व्हेंटिलेटर भ्रष्टाचार प्रकरणात घेतले जाते तरी हे सगळे आमच्या वर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना दिसत नाही. डोळ्यावर पट्टी बांधलेल्याना कसे दिसणार हे सगळे कारण त्यांना करायचे आहे फक्त राजकारण आणि हा #महाराष्ट्र_द्रोह आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे महानगरपालिकेचा ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम

News Desk

इंदापूरमध्ये सोलापूर वरून आलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह….

News Desk

कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा ! नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk