नाशिक | आत्ता बस्स झालं ! साडेतीन वर्ष या सरकारला आपण खूप सहन केलं, त्यामुळे तयारीला लागा. माझे तरुणांना,आदिवासींना आवाहन आहे तुमचं जीवन चांगलं जगवायचं असेल,माझ्या आया बहिणींचा सन्मान राखायचा असेल तर या सरकारला खाली खेचण्यासाठी आणि परिवर्तनासाठी तयार व्हा असे आवाहन शरद पवार यांनी नाशिकच्या जाहीर सभेत केले.
शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यसरकारवर जोरदार आसुढ ओढले. सरकारच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये बळीराजाला अस्वस्थ करण्याचे दिवस दाखवणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले.
या सभेत शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न वेशीवर आणल्याबद्दल त्यांनी पाच जिल्हयातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
नाशिक जिल्हा मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये हा जिल्हा ज्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतला त्यांनी फक्त घोषणाच केल्या. दत्तक घेणाऱ्या बापाने ढुंकुनही पाहिले नाही. वेळ आली आहे हा उसना बाप नको म्हणण्याची. आम्हाला आमचा जीवाभावाचा बाप हवा म्हणून हा आम्हाला भाडोत्री बाप नको ही भावना मला नाशिकमध्ये ऐकायला मिळाली असे सांगितले.
शेती हा देशाचा कणा आहे. ६० टक्के वर्ग शेतीवर आहे आणि ११६ कोटीच्या लोकांची भूक भागवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. आज शेतकऱ्यांच्या घरातील एका कर्तुत्ववान माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. केंद्रसरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र करुन दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. माझं म्हणणं आहे त्यापेक्षा जास्त शेतकरी दरवर्षी आत्महत्या करत आहेत. आज आत्महत्या दर ४२ टक्क्यांवर गेला आहे आणि तो वाढतच आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आस्था असलेल्या लोकांकडे सत्ता असली की काय होते हे त्यावेळी तुम्ही अनुभवलं आहात परंतु आज शेतकऱ्यांविषयी अनास्था असलेल्या लोकांकडे सत्ता आहे आणि त्याचे परिणाम आपण पहात आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा तसाच, शेतकऱ्यांची बेअब्रु करणाऱ्या या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. हा हल्लाबोल त्यासाठीच असून हा हल्लाबोल दिल्लीची गादी हलविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी दिला.
आज सरकारने नवीन कारखानदारी आणली नाही, नवीन उदयोग नाही आणले. जमीन आज कमी होतेय आणि शेतीवरील कुटुंब वाढत आहेत. ३५ कोटी लोक होते त्यावेळी जमीन कमी होती. आज ११२ कोटी झाले आणि जमीन कमी होतेय. जमीन कमी होतेय आणि जमीनीवर राहणारी माणसे वाढत आहेत नुसती शेती करुन चालणार नाही तर प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील एकाला रोजगार मिळवून दिला पाहिजे तरच शेती वाढेल, कुटुंब सुधारेल आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवा असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
नाशिकने उत्तम शेती करण्याचा आदर्श घालून दिला आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हयातील माणसं परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करतायत. परंतु सरकारची नीती त्यांच्या बाजुने नाही. आज ज्वारी,बाजरी,तुर,मुग, तीळ,सुर्यफुल, यांच्या किमतीमध्य घट झाली आहे.याच्या किमतीची घटलेली आकडेवारी शरद पवार यांनी यावेळी सांगितली. या शेतकऱ्यांच्या शेतीला चांगली किंमत मिळत नाहीय. भांडवली ताकद शेतकऱ्यांची कमी होतेय अशी भीती पवारांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करण्याची ताकद मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. कारण तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आस्था नाही असेही शरद पवार म्हणाले.
सभेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही सरकारवर टिका केली. केंद्राने आणि राज्यात नोकऱ्या नाहीत,रिक्त पदे सरकार भरत नाही. आमचा तरुण जाणार कुठे असा सवाल सरकारला विचारतानाच २ कोटी नोकऱ्या देतो म्हणणाऱ्या सरकारला केंद्रातून आणि राज्यातून उखडून टाकण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी कामाला लागा असे आवाहनही प्रफुल्ल पटेल यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भाषणाच्यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केल्याचे सांगितले. त्यांच्या वाक्याचा धागा पकडत सुनिल तटकरे यांनी अशा किती लाईट बंद करुन शरद पवारांची जनतेच्या हदयात पोचलेली प्रतिमा कधीही कोण घालवू शकत नाही असे आव्हानही सरकारला दिले. त्यांनी आपल्या भाषणात नाशिकच्या नारपारचे पाणी गुजरातला न देण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. शरद पवारांनी शेतकऱ्यांनी सुगीचे दिवस दाखवले परंतु या सरकारने साडेतीन वर्षात शेतकऱ्यांचे जीवन मातीमोल करण्याचे काम केल्याची जोरदार टिका केली. यावेळी कम्युनिष्ट पार्टीने काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देत असल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील जनता मला विचारतेय की चौथ्या अर्थसंकल्पाला तुम्ही किती मार्क द्याल तर माझ्यासमोर मैदानात एक स्कोअर बोर्ड आहे त्यावर शून्य लिहिले आहे असा टोला सरकारला लगावतानाच चौथ्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील जनतेला काहीच मिळाले नाही अशी टिकाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी आपल्या तडाखेबाज भाषणामध्ये पुन्हा सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा समाचार घेतला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या ६० वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इकॉनॉमी सर्वेमध्ये सरकाची कामगिरी समोर आली आहे. त्या पुस्तकामध्ये सरकार किती वाईट काम करतेय हे स्पष्ट झाले आहे असा टोला सरकारला लगावला. त्यांनी मराठी शाळेत एक जरी मुलं असलं तरी सरकारने शाळा सुरु ठेवावी असा इशाराही सरकारला दिला.
सभेत पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले. यानंतर जळगाव जिल्हयातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी आकांक्षा पवार हिने आपले विचार सरकारविरोधी मांडले. तिने सादर केलेल्या कवितेने तिला रडू आवरता आले नाही.
या सभेमध्ये माणिकराव शिंदे, प्रेरणा बेलकवडे, अर्जुन टिले, पुरुषोत्तम करळक, महेश दुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार जयंत जाधव यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी इगतपुरीचे संदीप गुळवे यांनी त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल जाहीर सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार जयदेव गायकवाड, आमदार पंकज भुजबळ, आमदार प्रकाश गजभिये,आमदार वैभव पिचड,आमदार राहुल जगताप, आमदार दिपिका चव्हाण, आमदार सतिश चव्हाण, आमदार रामराव वडकुते, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार जयवंत जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्य राणापाटील, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी खासदार अंकुश काकडे, माजी आमदार अशोक धात्रक, माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींसह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्राच्या आंदोलनाची सांगता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर विराट सभेने झाली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.