HW News Marathi
महाराष्ट्र

शिंदे सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

मुंबई | माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रायगड-अलिबाग जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येऊन २० पदांना मान्यता देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च येईल.

 

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी १४ नियमित पदे व एक पद बाह्य यंत्रणेद्धारे भरण्यात येईल. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी २० पदांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता ९८ लाख ८३ हजार ७२४ इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, बेलापूर हे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालय त्याचप्रमाणे बेलापूर येथेच जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा न्यायालयासाठी जिल्हा न्यायाधीश १९ नियमित पदे निर्माण करण्यात येतील व ५ पदे बाह्य यंत्रणेद्धारे भरण्यात येतील. तर वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी १६ नियमित व ४ पदे बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा न्यायालयासाठी १ कोटी ४ लाख ६८ हजार २९४ एवढा खर्च येईल तर वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी ९३ लाख ९३ हजार ९९८ इतका खर्च येईल.

बेलापूर येथेच एक कौटुंबिक न्यायालय स्थापन करून याकरिता १४ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे विवाह समुपदेशक व त्यांचे सहायभूत असे ५ पदे देखील या ठिकाणी भरण्यात येतील. यासाठी एक कोटी ३१ लाख ९६ हजार १९६ एवढा खर्च येईल.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) कार्यालय स्थापन करून नियमित १६ व ३ बाह्य यंत्रणेद्धारे अशी १९ पदे भरण्यात येतील. यासाठी एक कोटी २३ लाख ५७ हजार ८३४ रुपये खर्च येईल. सातारा जिल्ह्यातील वाई येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यात येऊन २४ पदे निर्माण करण्यात येतील. याकरिता १ कोटी ३ लाख ५३ हजार २२० इतका खर्च येईल. त्याचप्रमाणे वाई येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येवून १६ नियमित व ४ बाह्य यंत्रणेद्धारे अशा २० पदांना मान्यता देण्यात आली. यासाठी ९३ लाख ९६ हजार ६५२ इतका खर्च येईल.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यात येईल. यासाठी १९ नियमित पदे व ६ बाह्य यंत्रणेद्धारे अशी २५ पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी १ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यात येईल. यासाठी २५ पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ५ लाख ५७ हजार ७०६ इतका खर्च अपेक्षित आहे.

वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण
विविध वीज प्रकल्पांना गती येणार

अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही. केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. मात्र यासाठी सध्या असलेल्या शासनाच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकाना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे पारेषण कंपन्याचे विविध प्रकल्प रखडले आहेत. नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होईल. या सुधारित धोरणाप्रमाणे ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठी खालील प्रमाणे मोबदला देण्यात येईल.

मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या क्षेत्रफळाचे रेडीरेकनर मधील किंवा मागील ३ वर्षातील झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या आधारे सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येईल. मनोऱ्यातून जाणाऱ्या वाहिन्यांच्या पट्टयाखालील येणाऱ्या क्षेत्रासाठी अतिरिक्त १५ टक्के तसेच रेडीरेकनर किंवा सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या १५ टक्के असा एकूण ३० टक्के मोबदला दिला जाईल.

अपवादात्मक परिस्थितीत योग्य मोबदला ठरविण्याचे अधिकार उप विभागीय मुल्यांकन समितीस राहतील. पारेषण वाहिनीच्या विहित मार्गात कोणतेही बांधकाम करण्यास मान्‍यता राहणार नाही. पिके, फळझाडे किंवा इतर झाडांसाठीची नुकसान भरपाई संबंधित विभागाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे दिली जाईल. हे धोरण मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला लागू राहील.
मनोऱ्याने बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला थेट संबंधित शेतकरी तसेच जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. हे धोरण संबंधित शासन निर्णय जाहीर झाल्यापासून काम सुरु असलेल्या व नवीन प्रस्तावित अशा सर्व अति उच्चदाब पारेषण वाहिनी प्रकल्पाना लागू राहील. मोबदला निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समिती असेल.
या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल.

खरीप पेरण्या १०० टक्के

राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत ११८०.४ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ११५.७ टक्के पाऊस झाला असून १४३.१० लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे आज देण्यात आली.

कोविडची सद्य:स्थिती

सध्या राज्यात कोविडचा पॉझिटीव्हीटी दर २.५५ टक्के इतका असून सरासरी दररोज ४०० रुग्ण आढळतात. सध्या राज्यात २३८७ सक्रीय रुग्ण असून ४ जण व्हेंटिलेटरवर असून ३४ जण ऑक्सीजनवर आहेत. एकूण पहिला, दुसरा आणि प्रिकॉशनरी असे १७ कोटी ७२ लाख ४२ हजार ६१८ डोसेस देण्यात आले आहेत.

योजनांचा आढावा

केंद्र शासन पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांना अधिक गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. यावेळी बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सन्मान, स्वामीत्व- ड्रोनद्धारे गावांचे सर्वेक्षण, मृद आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड), किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी योजना त्याचप्रमाणे आयुष्मान भारत जनआरोग्य योजना व राज्य पुरस्कृत महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना यांचे सादरीकरण करण्यात आले.

खेळाडुंचे अभिनंदन

गुजरात येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळविला आहे त्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्राला एकूण सर्वाधिक १४० पदके मिळाली असून त्या खालोखाल हरियाणा व कर्नाटक ही राज्ये आहेत. या पदकांमध्ये ४० सुवर्ण पदके महाराष्ट्राला मिळाली आहेत.
महाराष्ट्रातील खेळाडुंच्या कामगिरीमुळे एकूणच राज्यातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल आणि देशात महाराष्ट्राचा दबदबा निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेते आनंदराव आडसुळांना दिलासा नाहीच!

News Desk

रजनीगंधा खा, डोकं शांत ठेवा!; आव्हाडांच्या वादग्रस्त सल्ल्याने खळबळ

News Desk

पाचशे बाळंतपण करणाऱ्या जळूबाई वाघमोडे यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळी निधन

News Desk