मुंबई ; पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जनता,स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या, सेलिब्रिटी, शासन एकत्र आले असून याद्वारे जलसंधारणाची कामे होतील. महाराष्ट्रात मोठे परिवर्तन घडविणारे काम होत आहे. वॉटर कप व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2019 पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या स्पर्धेसाठी राज्य सरकार सर्व सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने सर्वसामान्यांना वेड लावले आहे. एखाद्या कामासाठी झपाटलेली, सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी व त्यातून आनंद घेणारी माणसे असे चित्र पहायला मिळाले. या स्पर्धेमुळे स्वावलंबी, एकसंघ झालेली गावे पहायला मिळाली आहेत. गावांतील लोकांनाच परिवर्तन करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यातच फाऊंडेशनचे यश आहे. वॉटर कप स्पर्धेला जनता,स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या यांबरोबरच सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी यांनी बहुमोल सहकार्य केले.
पहिल्यादा कार्पोरेट कंपन्यांनी समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून या उपक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या स्पर्धेत सहभागी सात हजार गावांच्या माध्यमातून एक चतुर्थांश महाराष्ट्रातील लोक कामे करणार आहेत. पाणी फाऊंडेशन’ ही संस्था आमीर खान व त्यांच्या पत्नी श्रीमती किरण राव यांनी स्थापन केली असून सन 2016 पासून राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी वॉटरकपच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22मे 2018 आहे.
विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये व 40 लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून स्पर्धेत आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेत विजेत्या गावांना एकूण 10कोटी रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत. 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करतात. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाऊंडेशनचे प्रमुख तथा उद्योजक मुकेश अंबांनी, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.