HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई | करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (१७ मार्च) येथे जाहीर केले.

मदान यांनी सांगितले की, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज रोजी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.

राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या. तसेच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच, आकडा ११७ वर

News Desk

गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर मराठ्यांचे ठिय्या आंदोलन

swarit

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती

News Desk