HW News Marathi
Covid-19

राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद, तर ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड

मुंबई | लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार ६९७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद झाली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (९ मे) दिली आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ८ मे २०२० या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख २४५ गुन्हे नोंद झाले असून १९ हजार २९७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाईचे आदेश

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९४ घटना घडल्या. त्यात ६८९ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबरवर ८७ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर ८७ हजार १४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर ‘क्वारंटाईन’ असा शिक्का आहे अशा ६५८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २ लाख ५३ हजार २५ व्यक्ती क्वारंटाईन आहेत अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२८९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ५४ हजार ६११ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३, पुणे १, सोलापूर शहर १ अशा ५ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ७१ पोलीस अधिकारी व ५७७पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

रिलिफ कँप

राज्यात एकूण ४ हजार १४४ हजार रिलिफ कँप आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४ लाख ०४ हजार ४९७ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. उदाहरणार्थ मुंबई पोलिसांच्या ऐवजी आर्मी येणार अशीही अफवा आहे. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे,असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या वाढीव लॉकडाऊन निर्णयाचं कौतुक, आनंद महिंद्रांनी वाजवल्या टाळ्या

News Desk

आपल्या नागरिकांना राज्यात आणण्यास पश्चिम बंगाल सरकारचे सहकार्य नाही !

News Desk

Murlidhar Mohol HW Exclusive : पुण्यातील लॉकडाऊन वाढवायला हवा !

News Desk