HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत! – नाना पटोले

मुंबई | राज्यात विदर्भ व मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, आता या सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

 

विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. आता खताच्या किमतीही तिप्पट झाल्या आहेत, बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र सरकारनेही हात वर करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. आमची मागणी कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये व बागायती, फळबागेसाठी १.५ लाख रुपये आहे ती राज्य सरकारने तात्काळ द्यावी.

 

आपण स्वतः अतिवृष्टी भागाला भेट देऊन पाहणी केली आहे. राज्यात ओला दुष्काळाची स्थिती आहे पण सरकार मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे सरकार आहे. विधानसभेत प्रश्न उपस्थित करूनही सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे, असेही पटोले म्हणाले.

Related posts

प्रजासत्ताक दिनी सजली विठुरायाची पंढरी

News Desk

विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदतवाढ संपणार

News Desk

#COVID19 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

News Desk