HW News Marathi
Covid-19

नाशिक, नांदेड, परभणीत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

मुंबई | राज्यात आजपासून (७ जून) अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ५ टप्प्यांत हा अनलॉक होणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड किती व्यापले आहेत यावर या टप्प्यांची विभागणी करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांत सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं उद्यापासून अनेक निर्बंध शिथिल केल्याची अधिसूचना नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज जारी केली आहे.दररोज पहाटे पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू राहील आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पहाटेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचं मांढरे यांनी सांगितलं आहे.

नांदेड

नांदेड जिल्ह्यातही निवडक सेवा, आस्थापना आणि उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. आजपासून शासनाच्या पुढच्या आदेशापर्यंत हे आदेश निर्गमित केले आहेत.

परभणी

परभणी जिल्हा प्रशासनानं उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

गडचिरोली

गडचिरोलीत आजपासून सर्व दुकानं ७ ते ४ वाजतापर्यंत सुरु राहणार असून सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दररोज, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरु राहणार आहेत.राज्य सरकारने ठरवलेल्या निकषानुसार, गडचिरोली जिल्ह्याचा समावेश पातळी क्रमांक ३ मध्ये होत असून त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे.

सोलापूर

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून शहरात अत्यावश्यक सेवेसह काही सेवा सुरळीत आणि नियमित सुरु करण्यास परवानगी दिली आहे तर ग्रामीण भागात त्या सेवा ४ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

लातूर

लातूरचा समावेश पहिल्या टप्प्यात झाला असल्याने याठिकाणीही सर्व प्रकारचे निर्बंध उठवायला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची दुकानं, मॉल, रेस्टॉरंट, चित्रपट आणि नाट्यगृहं इथे नियमित वेळेनुसार सुरू राहू शकतील.

बीड

बीडचा समावेश तिसऱ्या श्रेणीत होत असल्याने याठिकाणी दुकानं संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली असून सवलत मिळालेली खासगी कार्यालयं ४ वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल मात्र बंदच राहतील. लग्नाला ५० तर अंत्यविधीला केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जळगाव

जळगाव जिल्हा पहिल्या श्रेणीत असल्याने इथे सर्व प्रकारची दुकानं रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. मॉल, रेस्टॉरंट, चित्रपट आणि नाट्यगृह, जिम, सलून, पार्लर ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहेत. लग्न आणि अंत्यविधीला केवळ ५० जणांचा उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भंडारा

भंडारा जिल्ह्यातही उद्यापासून बाजारपेठा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी ७ पूर्णांक ६७ शतांश टक्के असल्याने जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन राहणार आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात मात्र येत्या ९ जूनपर्यंत कडक लॉकडाउन सुरूच राहणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज स्पष्ट केलं आहे.राज्य शासनाच्या अनलॉकच्या नव्या निकषांनुसार रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे काही प्रमाणात शिथिलता मिळण्याची शक्यता होती. मात्र जिल्ह्यातली करोनाची स्थिती लक्षात घेता गेल्या ३ जूनपासून जारी केलेले कडक लॉकडाउनचे नियम येत्या ९ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

वर्धा

वर्धा जिल्हा सध्या लेव्हल तीनमध्ये असल्यानं मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकान, व्यवसाय दररोज सकाळी 7 ते 4 तर इतर सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, मॉल, चित्रपट, नाट्यगृहे बंद असणार आहेत.

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1% पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात सध्या लेव्हल 3 लागू आहे. त्यामुळे आता मंदिरं सुरू करून या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा 12.70 टक्के असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेली टक्केवारी 66.65 टक्के इतकी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शासनाकडील आदेशान्वये चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. त्यानुसार साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारास अनुसरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार 7 जून पासून पूर्ण अनलॉक होणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोनाचा कहर सुरुच! मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली

News Desk

WHOने केले मुंबईच्या धारावी मॉडेलचे आणि मुख्यमंत्र्याचे विशेष कौतुक

News Desk

राजधानी दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाउन जाहीर!

News Desk