मुंबई | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. “सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत; देशमुखांच्या चौकशी बाबतही हाच विश्वास ठेवा” २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?, असं मोहोळ यांनी म्हटले आहे.
‘पुणे महापालिकेला कचरा प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, त्यातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हा निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काल (२८ जून) पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सुप्रिया सुळे यांनी सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आम्ही चौकशीसाठी तयार असल्याचं प्रत्युत्तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे. “पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रिया सुळे यांना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून, त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो.
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रिया सुळे यांनी हाच विश्वास कायम ठेवावा. त्यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?,” असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
“उलट गेल्या ४ वर्षात आम्ही कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जात आहे. अगदी कालच पुण्याच्या Waste Managment ची दखल केंद्राने घेतली. कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६ नवे प्रकल्प हे आमच्याच काळात म्हणजे गेल्या चार-साडेचार वर्षांत सुरू झाले. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महानगरपालिका आल्यानंतर पुणे शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली.
याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ‘एक्टिव्ह’ होत असलेल्या सुप्रिया सुळे यांनी घ्यावी. आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे सुळे यांनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे,” अशी टीका मोहोळ यांनी आहे.
सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत !
पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 28, 2021
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
“पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि रामटेकडी येथील कचरा डेपोंमध्ये कित्येक वर्षापासून येत आहे. इथे येणार्या कचऱ्यावर प्रक्रिया होणं गरजेचं आहे. मात्र सध्या कचरा डेपोतील परिस्थिती लक्षात घेता, कोणतीही प्रक्रिया करण्यात न आल्याचे दिसत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आजवर वेळोवेळी कचरा प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. मग हा निधी गेला कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी सुळे यांनी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.