HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार!- मंगलप्रभात लोढा

मुंबई | राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते  सकाळी मेळाव्याचे उद्घाटन झाले.

राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे मंत्री  लोढा यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवीत आहे. नुकतेच १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. रोजगार मेळावा उपक्रमालाही चालना देण्यात येत असून येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.

कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत 60 हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, ती आता शासनाने ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळे रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत. आहे.  रोजगार मेळाव्यांमध्ये  नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती, उमेदवारांचे कौन्सिलिंग असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग

टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, बझवर्क्स बिजनेस सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स  जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, शार्प एचआरडी सर्विस, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, करिअर एन्ट्री, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, पियानो प्रेसिडेल या कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचेही स्टॉल मेळाव्यामध्ये होते. त्यांच्या मार्फत कौशल्य विकास आणि रोजगारविषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली.

वॉर्ड बॉयपासून सायंटिस्ट पदापर्यंतच्या रिक्त जागांसाठी मुलाखती

दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्या या मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. बँक जॉब, एचआर एडमिन, आयटी जॉब्स, बीपीओ, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, पायथॉन डेव्हलपर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्विस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाउसकीपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायंटिस्ट, सीनियर सायंटिस्ट, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी या कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

News Desk

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

swarit

महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये कोणताही गट नाही- खासदार प्रतापराव जाधव

News Desk