HW Marathi
कोकण महाराष्ट्र

…तर तिवरे धरण फुटले नसते

चिपळुण । गेल्या तीन ते चार दिवसात कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले आणि एकच हाहाकार माजला. हे धरण फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि त्या पाण्याला असलेला जोरामुळे या धरणाच्या पाण्यात २४ जणे वाहुन गेले. तर आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह हाती आल्याची माहीती मिळाली आहे. मंगळवारी (२ जुलै) रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे बेंडवाडीतील १३ घरही वाहुन गेल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली आहे. तर आजूबाजूच्या गावात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र, ही घटना टाळता येऊ शकली असती. अशी भावनाही आता व्यक्त होत आहे. कारण खुद्द जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी अशी कबुली दिली आहे. चिपळूणमधील  तिवरे धरणाला तडे गेल्याची तक्रार येथील गावकऱ्यांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि जे व्हायला नको तेच झाले. या धरण फुटीवर चौकशीचे आदेश देण्यात आले, असल्याचेही महाजन यांनी सांगितले आहे. गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरुन तिवरे धरणाला दुरुस्तीची गरज असल्याचेही लक्षात आले होते. गावकऱ्यांच्या तक्रारीकडे खासदार विनायक राऊत यांनी त्याची दखल घेऊन धरणाच्या कामाकडे लक्ष देण्याच्या सुचनाही अधिकऱ्यांना केल्या होत्या. त्यावर फक्त माती टाकून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो ही फोल ठरला. वेळेत योग्य ती काळजी घेऊन तिवरे धरणाची डागडुजी करण्यात आली असती तर आज येथील अनेकांचे प्राण वाचले असते.

तिवरे धरण २०१२ साली बांधून पूर्ण झाले होते. केवळ सात वर्षातच धरणाला तडे गेले. या धरणाची पाणी साठवणूक क्षमता २.४५२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणफुटीचा फटका भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांना बसला असून या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याविषयी गिरीश महाजन म्हणाले की, “ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.” “आता या धरणाच्या आजूबाजूच्या गावांना धोका नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. आसपासच्या इतर गावातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले असून आवश्यक मदत पुरवली जात आहे,” असेही गिरीश महाजन यांनी नमूद केले. “मुख्यमंत्री रात्रीपासून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मी स्व: तिथे जाणार आहे. दुरुस्ती झाल्याचे अधिकारी सांगत आहे. परंतु या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच बेघरांना मदत दिली जाईल,” असेही महाजन म्हणाले.

 

 

Related posts

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

News Desk

उद्धवजी भाजपच्या चुकीला माफी नाही ना ? उपमुख्यमंत्र्यांचा सवाल ,मुख्यमंत्र्यांचं उत्तर !

Arati More

राष्ट्रवादी काँग्रेस यशाची असंख्य शिखरे गाठेल व्यक्त केला असा विश्वास…

News Desk