HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ‘आक्रमक नेते’ नाना पटोलेंचा राजकीय प्रवास कसा आहे?

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगत होती. अनेक जणांची नावे यादीत होती. या सगळ्या नावांना पाठी टाकत नाना पटोले अखेर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. आज (५ फेब्रुवारी) कॉंग्रेसकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले यांचा राजकीय प्रवास हा रंजक आहे.अनेक अडचणींना सामोर जात ते विधानसभेच्या अध्यक्षपदी पोहोचले होते आणि त्यानंतर आता थेट ते महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. जाणून घेऊयात नाना पटोलेंबद्दल…

नाना पटोले आहेत तरी कोण ?

काँग्रेसचे नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलां सारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि ते ‘जायंट किलर’ ठरले. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले. विद्यार्थी दशेपासूनच ‘नानाभाऊ’ म्हणून ओळख होती. आक्रमक, ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार ही पदेही भूषवली आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा केला होता पराभव

१९९९ व २००४ मध्ये कॉंग्रेसने लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून त्यांना उमेदवारी दिली. यात ते विजयी झाले. मात्र, ‘आक्रमक नेते’ म्हणून ओळख असलेल्या नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर तत्कालीन कॉंग्रेस पक्ष गंभीर नसल्याचे कारण देत२००८ मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दरम्यानच्या काळात ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००९मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपकडून ते विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी जवळपास दीड लाख मताधिक्याने पराभव केला होता.

…म्हणून ‘आक्रमक नेता’ या नावाने झाली ओळख

२०१७ ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत जाहीर टीका केली होती. शेतकरी व इतर मागासवर्गाच्या प्रश्नांवर लोकसभा सदस्य व भाजपमधून राजीनामा दिला होता.त्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली होती. घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूरमधून केंद्रीमंत्री नितिन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, यात पटोले यांचा पराभव झाला होता. ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळेच त्यांची ओळख आक्रमक नेता अशी झाली होती.

एवढंच नव्हे, तर नाना पटोले हे शेतीप्रश्नी केवळ महाराष्ट्रातच परिचयाचे नाहीत, तर देशव्यापी संघटनेचा त्यांना अनुभव आहेत. काँग्रेसच्या कृषिविषयक संघटनेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाब-हरियाणापासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. या गोष्टीचा कृषिप्रधान आणि ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखण्यासाठी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांच्या ED कोठडी सुनावणीदम्यान न्यायालयात नेमके काय झाले

Aprna

सारथी ही ‘स्वायत्त’ संस्था म्हणून टिकली पाहिजे, संभाजीराजे यांची उपमुखमंत्र्यांकडे मागणी

News Desk

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं – अजित पवार

News Desk