HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करणार, मलिकांची माहिती

मुंबई | एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावले टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मलिक पुढे म्हणाले की, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गृहमंत्री अनिल देशमुख कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करतील, असे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. “कायदा सुव्यवस्था हा राज्याचा विषय असताना केंद्र सरकारने परस्पर हा तपास स्वत:कडे घेणे अयोग्य आहे. शिवाय, त्याला राज्याने मान्यता देणे त्याहून अयोग्य आहे. तपासाची सूत्रे एनआयएकडे गेली असली तरी राज्याने स्वतंत्र तपास करावा,” अशी भूमिकाही पवारांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत मांडली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज (१७ फेब्रुवारी) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये बैठक घेत आली होती.

मलिक पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी अचानक या प्रकरणांचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरुन विरोधकांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र, महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, भाजपला सत्तेत राहण्याचा रोग झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वाद असल्याचाही अपप्रचार केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.  मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह १६ मंत्री उपस्थित होते.

 

 

Related posts

प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk

दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण

News Desk

सलग तीन वर्षे सुट्टीत वृक्ष संवर्धन

News Desk