HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे !

मुंबई | कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणे हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (२८ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. आपला फोकस कामावर असला पाहिजे, हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल, अशी मिश्किल टीका सुप्रिया सुळेंनी विरोधकांवर केली आहे.

लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे, असे वैयक्तिक मत मांडतानाच हे अनलॉकिंग कॅफे किंवा कॉफी डेमध्ये जाण्यासाठी नाही तर काम करुन आपण नियम व कायदे पाळू. देशाला आज कामाची गरज आहे. काम व कष्ट करून आपले राज्य व देश उभा करण्याची वेळ आहे. नुसते घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जी दिशा देतील. सरकार जे नियम व कायदे बनवेल त्याचे पालन करावे. हे नियम व कायदे सरकारसाठी नाही तर आपल्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो निर्णय मिलिटरीच्या शिस्तीप्रमाणे पालन करा, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले.

आज राज्य व देश बांधण्याची… कष्ट करण्याची… एकमेकांचे हात धरण्याची… विचारांची लढाई लढण्याची व कष्ट करण्याची वेळ आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. माझ्या पक्षाचे लोक चांगले काम करत आहेत त्यांचे कौतुक करणारे पोस्टिंग करण्याचे सरकारने नियम केल्यावर बंद केले. आज ४० दिवस झाले मी घराबाहेर पडलेली नाही. मी सरकारचे नियम तंतोतंत पाळत असल्याचेही सुप्रिया सुळेंनी जनतेला सांगितले.

लवकर आर्थिक अडचणीवर मात करु

जितक्या लवकर नियम पाळू तितक्या लवकर लॉकडाऊन उठेल तेवढ्या लवकर आर्थिक अडचणीवर मात करु शकतो. आपले राज्य पायावर उभे कसे राहिल. आज आपल्यासमोर काम करुन आपली आर्थिक स्थिती जाग्यावर आणण्यासाठी काम केले पाहिजे. आरोग्य व आर्थिक स्थिती यांच्यातील सुवर्णमध्य साधूनच आपल्याला पुढे जावे लागेल असे सांगतानाच आज अन्न वाटतोय पण आता त्यांना अन्न नकोय तर हाताला काम हवे आहे. शिजवून दिलेले अन्न नकोय तर रेशन हवे आहे. दहा दिवसाचे रेशन दिले तर ती लोके दहा दिवस घराबाहेर पडणार नाहीत. शिवाय प्रशासनावरील ताणही कमी होईल त्यामुळे शक्यतो रेशन कीट देणेच महत्वाचे आहे असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात थुंकणे थांबवण्यासाठी एक मोहीम राबविण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले आहे. शिवाय टीबी आजारामुळे वर्षाला १५ लाख लोकांचा मृत्यू होत, असल्याची आकडेवारी सांगितली. या आजारावर उपचार आहेत तरी इतके लोक प्राण गमावत आहेत. तर दुसरीकडे कोरोनावर अजून लस आलेली नाही. एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत का असा सवालही त्यांनी जनतेला केला.

२४ तास काम करणाऱ्या पोलिसांना केला मानाचा मुजरा

आज कोरोना लढ्यात २४ तास प्रशासन काम करत आहे. त्यांचा अभिमान बाळगतानाच या सर्व योगदानाबद्दल सुळेंनी सर्वांना मानाचा मुजरा केला. शिवाय बलिदान दिलेल्या पोलिसांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कुटुंबाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. त्यांच्यासोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. सरकारने त्यांच्या कुटूंबाबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबाबत सरकारचे आभार मानले. गरोदर मातांना किंवा तिच्या लेकराला वेळेवर मदत मिळालीच पाहिजे. त्यांच्यासाठी काही निर्णय सरकारला घेता येतात का हे पहावे आणि तसा प्रयत्न करावा अशी मागणीही सुळेंनी केली.

सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता व मास्क घालून कामावर जावे

आज आपण आरोग्यासाठी लढतोय तर दुसर्‍या बाजूला अर्थव्यवस्थेत अडकलो आहोत. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता व मास्क घालून कामावर जावे लागणार आहे. लोकसंख्येचा विचार केला तर सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार आहोत. अनलॉकिंग झाल्यावर आपण संवेदनशील वागणार आहे का? याबद्दल सुप्रिया सुळेंनी शंका व्यक्त केली आहे. समाजातील अनेक घटक आज अडचणीत आहेत याची जाणीव सरकारला आहे. केंद्र व राज्य सरकार यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तुमच्या सगळ्यांची साथ या लॉकडाऊनमध्ये जशी आहे. तशीच साथ लॉकडाऊन उठल्यावर द्याल व येत्या काही दिवसात महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा राहून अडचणीवर मात करुया आणि देशात महाराष्ट्र अव्वल नंबरवर राहिल यात तीळमात्रही शंका नाही असा विश्वास खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला. आपण हे युद्ध जिंकणारच आहोत. येत्या आठ – दहा दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्या काही गाईडलाईन्स देतील त्याचे तंतोतंत पालन करा असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यूझीलंडने अशी केली कोरोनावर यशस्वी मात

News Desk

कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला

News Desk

देशात 38 हजार 792 नवे रुग्ण आढळले

News Desk