HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंढरपूर मंगळवेढा फेरनिवडणुकीची मागणी राष्ट्रवादीने केली नाही, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे स्पष्टीकरण!

पंढरपूर | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या हाती विजयाचा गुलाल आला. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली आहे. दरम्यान, आज (४ मे) यावरुनच वादंग निर्माण झाले होते. राष्ट्रवादीच्या लीगल सेलने ही निवडणूक पुन्हा घेण्याचा मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही बाब चुकीची असून अशी कोणतीही मागणी राष्ट्रवादीच्या लीगल सेलने केली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी दिले आहे.

काय आहे पत्रात?

अॅड. नितीन माने या नावाची व्यक्ती स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची सदस्य असल्याचे भासवत आहे. या व्यक्तीने तसे लेटरहेड देखील बनवले आहे तसेच या लेटरहेडचा वापर करून, पार्टी लिगल सेलच्या नावाचा गैरवापर करून, विविध निवेदने व तक्रारी ही व्यक्ती देत आहे. परंतु अॅड. नितिन माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलशी काहीही संबंध नाही.

त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही वा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचा दूरान्वयानेही संबंध नाही. त्यामुळे अॅड. नितिन माने यांच्यावर सेलच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये व पत्रव्यवहार करू नये, असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.

दरम्यान आता या पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापर करण्यात आला. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन फेरनिवडणूक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे अॅड नितीन माने यांनी याबाबतची मागणी केली होती.

‘विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले.’ असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीने केला.

याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक फेरनिवडणूक घेण्याबाबत सहा विविध मागण्या केल्या आहेत.

Related posts

गुगलवर राहुल गांधी सरस, अमित शहांना टाकले मागे

News Desk

प्रितम मुंडे यांचा “रोड शो”

News Desk

…तर मी कधीच दुष्काळ निवारणाबाबतचा निर्णय घेतला असता !

News Desk