HW News Marathi
महाराष्ट्र

‘रामराज्य’ येईल अशी मराठी जनतेची अपेक्षा, पूर्ण होऊ द्या इतकेच !

मुंबई | मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असून आता मंत्रिमंडळाने कामाला लागायला हवे. विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे. मंत्रीपदे व खातेवाटप हे एकप्रकारे ‘बक्षिसी’ व तडजोडीचेच उद्योग असतात. ते पूर्ण झाले आहेत. राज्यपालांनी रामप्रहरी सही केली. आता ‘रामराज्य’ येईल अशी मराठी जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण होऊ द्या इतकेच, शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली, पण राज्यपालांची झोपण्याची म्हणजे विश्रांतीची वेळ झाल्याने ते खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही करू शकले नाहीत. शेवटी रविवारच्या रामप्रहरी राज्यपालांच्या सहीशिक्क्याने मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे. राज्यपालांनी एक दिवसाचा विलंब केला म्हणून अनेकांनी भिवया उंचावल्या आहेत. जे राज्यपाल देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देण्यासाठी रात्रभर राजभवन उघडे ठेवतात व स्वतःही जागतात, त्या राज्यपालांनी विस्ताराच्या प्रस्तावावर सही केली नाही व विश्रांतीसाठी निघून गेले याचे आश्चर्य शरद पवारांना वाटणे साहजिकच आहे, सामनाच्या अग्रलेखातून महाविकासआघाडीच्या नेत्यांना खातेवाटप झाले आता कामाला अशा सुचना दिल्या तर राज्यपालांनी खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी करण्यास केलेल्या विलंबावर टीका केली आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असून आता मंत्रिमंडळाने कामाला लागायला हवे. विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे. मंत्रीपदे व खातेवाटप हे एकप्रकारे ‘बक्षिसी’ व तडजोडीचेच उद्योग असतात. ते पूर्ण झाले आहेत. राज्यपालांनी रामप्रहरी सही केली. आता ‘रामराज्य’ येईल अशी मराठी जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण होऊ द्या इतकेच!

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खातेवाटपही पार पडले. कोणत्या पक्षाने कोणती खाती घ्यायची याचा निर्णय आधीच झाला होता हे खरे असले तरी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या दिवसापासून खातेवाटप प्रत्यक्ष होईपर्यंत एक महिन्यापेक्षा जास्त काळ निघून गेला. मधल्या काळात लहानमोठय़ा अफवांच्या वावटळी आल्या व गेल्या. शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली, पण राज्यपालांची झोपण्याची म्हणजे विश्रांतीची वेळ झाल्याने ते खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही करू शकले नाहीत. शेवटी रविवारच्या रामप्रहरी राज्यपालांच्या सहीशिक्क्याने मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे. राज्यपालांनी एक दिवसाचा विलंब केला म्हणून अनेकांनी भिवया उंचावल्या आहेत. जे राज्यपाल देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देण्यासाठी रात्रभर राजभवन उघडे ठेवतात व स्वतःही जागतात, त्या राज्यपालांनी विस्ताराच्या प्रस्तावावर सही केली नाही व विश्रांतीसाठी निघून गेले याचे आश्चर्य शरद पवारांना वाटणे साहजिकच आहे. राज्यपालांनी आणखी एक-दोन दिवस वेळ काढला असता तर बरे झाले असते असे विरोधी पक्षाला वाटत असले तरी रविवारच्या रामप्रहरी राज्यपालांनी सही करून मंत्र्यांना कामे वाटून दिली आहेत.

नव्या खातेवाटपानुसार अजित पवार यांनी अर्थनियोजन खाते घेतले. उपमुख्यमंत्रीपदाचा ‘तुरा’ही मिळवला. दुसरे भाग्यवान ठरले आहेत नागपूरचे अनिल देशमुख. महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री म्हणून देशमुखांच्या नावास श्री. शरद पवार यांनी संमती दिली. ”आमच्याकडे गृहखाते कुणी घ्यायलाच तयार नाही, गृहखाते नको असे सांगणारेच जास्त आहेत” अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच दोन-तीन दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे गृहखाते अनिल देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय? गृहखाते हे जोखमीचे काम आहे. गेल्या काही वर्षांत ते आर.आर. पाटील, जयंत पाटील, भुजबळ वगैरे मंडळींनी सांभाळले. भाजप राजवटीत गृहखात्याची नंगी तलवार हातात घेऊनच मुख्यमंत्री फडणवीस फिरत होते, पण शेवटी या तलवारीनेच त्यांचा घात केला. हाती गृहखाते असूनही महाराष्ट्रात अनेक आंदोलने व संघर्ष पेटले. भीमा-कोरेगाव प्रकरणात राज्याचे गृहखाते हतबल झाल्याचे दिसले, पण विरोधकांचा काटा काढण्यात ते तत्पर ठरले. तेव्हा हे खाते जोखमीचे आहे. खरं तर अजित पवार किंवा दिलीप वळसे-पाटलांसारखा नेता गृहखाते सांभाळण्यास सक्षम होता, पण शरद पवारांनी भाकरी फिरवत गृहखाते विदर्भाकडे वळवले आहे. पवारांचा हा नवा प्रयोग किती यशस्वी होतो ते दिसेलच. बाकी एकनाथ शिंदे यांना नगरविकास, सुभाष देसाई यांना उद्योग तर काँगेसचे बाळासाहेब थोरात यांना महसूल व अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे कमीत कमी खाती ठेवली. मागच्या मंत्रिमंडळात दिवाकर रावते यांनी परिवहन खात्याचा चेहरामोहरा बदलला होता. आज परिवहनच्या सीटवर अनिल परब बसले आहेत. दादा भुसे यांना कृषी खाते मिळाले तर आदित्य ठाकरे यांना त्यांच्या आवडीचे पर्यावरण, पर्यटन अशी खाती देण्यात आली आहेत. सार्वजनिक वितरण भुजबळांकडे, सामाजिक न्याय धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले. हा शरद पवारांचा निर्णय असावा. उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण तर वर्षा गायकवाड शालेय शिक्षण, अमित देशमुखांवर वैद्यकीय शिक्षणाबरोबर सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी आली आहे. एकंदरीत काय तर मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप झाले असून आता मंत्रिमंडळाने कामाला लागायला हवे. ऊर्जा आणि वनखाते विदर्भाकडे गेले आहे. विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबई-ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले गृहनिर्माण खाते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देऊन शरद पवार यांनी आव्हाडांच्या निष्ठsचे बक्षीस दिले आहे. मंत्रीपदे व खातेवाटप हे एकप्रकारे ‘बक्षिसी’ व तडजोडीचेच उद्योग असतात. ते पूर्ण झाले आहेत. राज्यपालांनी रामप्रहरी सही केली. आता ‘रामराज्य’ येईल अशी मराठी जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण होऊ द्या इतकेच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : पत्रकाराच्या अटकेप्रकरणी काय म्हणाले अमोल कोल्हे ?

News Desk

शेतीतलं शिवसेनेला काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही, निलेश राणेंचा प्रहार 

News Desk

विनापरवाना मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार श्वेता महाले म्हणतात, “होय, आम्ही गुन्हेगार…”

Aprna