मुंबई | मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ज्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगिणी खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. या सगळ्या चर्चांना पुर्णविराम लावत पंकजा मुंडे यांनी आज (९ जुलै) पत्रकार परिषद मुंबईत घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्यात रंगली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागल्याने पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचं बोललं जात होतं. दुसरीकडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या देशातील किंवा राज्यातील एकाही नेत्याचं ट्वीट करत अभिनंदन न केल्याने चर्चा सुरु होती. दरम्यान पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदत घेत चर्चेवर खुलासा केला आहे.
“पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे”
शिवसेनेने आजच्या सामना संपादकीयमध्ये पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा डाव अससल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मला वाटत नाही भाजपाला मला संपवायचं आहे. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिलंय ते वाचलं नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देईन”.
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या….
सामनामध्ये काय म्हटलं आहे?
“श्री. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
मी नाराज नाही, पंकजा मुंडेंची कबूली
“आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचं कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
“मी भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्याने त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केलं म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद गेलं असं म्हटलं असून हे हास्यास्पद आहे,” असंही यावेळी त्या म्हणाल्या.
रात्री १२.३० वाजता भागवत कराड यांचा फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. माझे लोकांशी नातं आहे, संबंध नाही. नातं कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचं प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात असं यावेळी त्या म्हणाल्या.
गोपीनाथ मुंढेंनी बसवलेली घडी विस्कटू नये माझी जबाबदारी
मुंढेंना पर्याय म्हणून कराडांना पुढे केलं जातं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिखरलेल्या संतप्त समाजाला एका ठिकाणी आणणं माझ्यासाठी आव्हान होतं. मुंढेंनी बसवलेली घडी विस्कटू नये माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्यातील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे”.
भाजपाला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही
“टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहिती नाही. पण हे भाजपाला मान्य नाही. भाजपाला देश प्रथम, नंतर राष्ट्र आणि नंतर आपण. भाजपात मीपणा मान्यच नाही. आपण, आम्ही असं म्हणणं मान्य आहे. त्यामुळे अशी कोणती टीम असणं पक्षाला मान्य असेल असं वाटत नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.