मुंबई | अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘हर घर है डोनर’ या अनोख्या मल्टी ऑर्गन आणि कॅडेव्हर दान जनजागृती मोहिमेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आरंभ केला. अवयवदानाचा निर्णय ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांकडून घेतला जातो. पण याबाबत पुरेशी आणि योग्यरित्या जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘हर घर है डोनर’ ही योग्य संकल्पना आहे. या चळवळीत शासन आणि स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या तरच जनजागृती होईल, असे टोपे म्हणाले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, संचालक आरोग्य सेवा डॉ. रामास्वामी, यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट मुंबईचे शिशीर जोशी, रोटो-सोट्टो संस्थेच्या डॉ. सुजाता पटवर्धन, केईएमचे अधिष्ठाता डॉ. रावत आणि डॉ. अनिल उपस्थित होते. प्रोजेक्ट मुंबई आणि रोटो-सोटो संस्था कुटुंबातील प्रत्येकाने अवयव दान करण्याची प्रतिज्ञा करावी यासाठी प्रयत्नशील आहेत. उपक्रमासाठी अमर गांधी फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था मदत करत आहे.
यासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी शाळा, शैक्षणिक संस्था आणि गृहनिर्माण संस्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रोजेक्ट मुंबईचा उद्देश आहे. इतर समविचारी संस्थांना सोबत आणण्याची योजना आखत आहोत जेणेकरून जागरूकता वाढेल, असे जोशी यांनी सांगितले. ‘हर घर है डोनर’ एक युनिट म्हणून देणगी देणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर जागरूकता आणि प्रतिज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी समुदायांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. प्रतिज्ञा फॉर्म www.projectmumbai.org वर मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.