मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल (५ एप्रिल) चर्चा केल्यानतंर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (६ एप्रिल) पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींवर भाष्य केले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. राज ठाकरे यांना राज्य सरकारवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी खास शैलीत उत्तर दिले.
राज ठाकरे आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना महाविकासआघाडी सरकारवरील आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या कोंडीविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटले की, नुकताच मला एका मित्राने मेसेज पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, असा मजकूर त्यामध्ये होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
या संपूर्ण पत्रकारपरिषदेत राज ठाकरे कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांची एकप्रकारे पाठराखण करताना दिसले. उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना सकारात्मक असल्याचे राज यांनी म्हटले. तसेच परमबीर सिंग प्रकरणामुळे ठाकरे सरकार अपयशी ठरले असे वाटते का, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, पोलीस दलात बदल्यांचे बाजार होणे ही काही नवी बाब नाही. आपण सरकारला वेळ दिला पाहिजे. अनिल देशमुख पैसे गोळा करण्यासंदर्भात जे बोलले, ते लांछनास्पदच आहे. पण परमबीर सिंह यांना १०० कोटींचा साक्षात्कार पद गेल्यानंतरच का झाला, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘मंत्र्यांकडून चुका होतात म्हणूनच विरोधक सरकार पाडण्याची भाषा करतात’
भाजपचे नेते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाविकासआघाडीचे नेते करत असतात. पण सरकार अशाप्रकारे पडायला काय इमारत आहे का? पिलर काढले आणि सरकार पडले असे होणार आहे का? तुमचे मंत्री चुका करतात म्हणूनच विरोधकांना संधी मिळते ना, असे खडेबोल राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सुनावले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोणत्या सूचना केल्या?
छोट्या व्यापाऱ्यांना दोन दिवस दुकानं उघडण्याची परवानगी द्या
जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या…
बँकांची जबरदस्ती थांबवावी
अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?
वीज बिल आणि व्यवसाय कर
सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे आणि जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्यावी, राज्याने केंद्राशी बोलावं, अशी सूचना केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
कंत्राटी कामगार
लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेऊन त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली. या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.
जीम सलून यांना परवानगी द्या
जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.
महाराष्ट्रात दोन कारणांमुळे रुग्णवाढ
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर लोक येत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे देशात फक्त महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.