HW News Marathi
Covid-19

राज ठाकरेंचं पुन्हा मोदींना पत्र, राज्य सरकारला ‘या बाबीसाठी परवानगी देण्याची केली विनंती!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्थिती लक्षात घेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, औषधांचा तुटवडा या सगळ्या बाबी लक्षात घेत राज्य सरकारच्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी पुन्हा एकदा ते धावून आले आहेत. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.

काय लिहिले आहे राज ठाकरेंनी पत्रात?

राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

प्रति

मा.श्री. नरेंद्र मोदी

पंतप्रधान, भारत सरकार

नवी दिल्ली.

सस्नेह जय महाराष्ट्र

विषय: “रेमडेसिविर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्यावं”

महोदय,

संपूर्ण देशात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत. काल तर देशात रूग्णसंख्येनं 3 लाखाचा आकडा मागे टाकला. मृत्यूचे आकडेही चिंताजनक आहेत. प्रेतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकी राज्यातलीही दृश्यं पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे. राजकारणाची मुळीच नाही. आत्ता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.

आरोग्यसेवेची यंत्रणा संपूर्णपणे कोसळली आहे. कोरोनाबाबतच्या चाचण्या पुरेशा गतीनं होत नाहीत, रूग्णालयात पुरेशा खाटा नाहीत, उपचारासाठी आवश्यक रेमडेसिविर आणि इतर साधनं उपलब्ध नाहीत, अत्यंत गरजेचा असा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत नाही. लसीकरण आपण खुलं केलं तर आहे परंतु त्यासाठी योग्य संख्येनं पुरवठा होईल की नाही ह्याची खात्री नाही. आपण ह्या साथरोगबाबतीतलं व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभं करण्याची गरज आहे.

भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या १०० वर्षात आलं नसावं. हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे.

अशातच बातमी वाचली की रेमडेसीविर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वतः करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला. आपण नुकतं देशाला उद्देशून केलेलं भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि ह्या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली पाहिजेत ह्यांचं मार्गदर्शनही केलं आहे.

त्यानंतर मग रेमडेसिविर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्रानं स्वतःकडे ठेवण्याचं प्रयोजन काय ? वास्तविक दिसतंय असं की त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणं ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असं असताना केंद्रानं रेमडेसिविरचं व्यवस्थापन स्वतःकडे ठेवण्याचं प्रयोजन काय ?

कोरोनाविरूध्दच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. ह्यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा. अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वतःकडे ठेवू नये. ह्यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्या कडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे असं दिसतं.

याबाबतीत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही.

कोरोनाविरूध्दची ही लढाई मोठी आहे. तिथे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीनं उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पध्दतीचा आत्माही तोच आहे.

मला आशा आहे की आपण माझ्या ह्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल आणि राज्य सरकारांना ह्या बाबतीतील प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल.

 

दरम्यान, या आधीही राज ठाकरे यांनी मोदींना पत्र लिहित काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. महाराष्ट्रात परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली होती. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून राज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी मोदींसमोर राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यावेळी त्यांनी मोदींना सवालही विचारला आहे. तसेच, महाराष्ट्रात लसीकरणासाठी केंद्राची मदत लागणार असल्याचेही राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

राज ठाकरेंच्या मोदींकडे या ५ प्रमुख मागण्या –

१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.

२) राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.

३) सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.

४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.

५) करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल- किशोरी पेडणेकर

News Desk

पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी लष्कराची मदत घेणार

News Desk

नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.९९%

News Desk