HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या लाटेवर आता शिवसेनेनं केला सवाल!

मुंबई | कोरोनाची लाट अजूनही संपूर्ण देशात थैमान घालत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या भीतीने अनेक लोक आधीच घाबरले आहेत. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात कोरोना रुग्णवाढीसह इतर गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

काय आहे सामना अग्रलेख?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करूनही थांबलेला नाही. तिसऱ्या लाटेची दहशत कायम आहे. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही. एक तर बेपर्वा लोकांवर दहशत निर्माण करून कोरोना निर्बंधांचे नियम पाळण्यास भाग पाडावे लागेल, नाहीतर लोकांनी स्वतःच नम्रपणे नियमांचा स्वीकार करून आणखी काही काळ जगावे लागेल. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही इतकाच सल्ला आम्ही आज देऊ शकतो! असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

-कोरोना पूर्णपणे गेला नाही, पण लोक आता निर्बंध पाळायला तयार नाहीत असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. हिमाचलमधील सिमला, कुलू मनाली अशा पर्यटनस्थळी गेल्या चार दिवसांपासून प्रचंड गर्दी उसळली आहे. ही गर्दी रोखता येत नसेल तर जम्मू-कश्मीरमधील अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच्या उत्सवांवर बंदी टाकून काय मिळवले? कोल्हापूरच्या व्यापारी मंडळानेही निर्बंध न पाळण्याची म्हणजे बंडाची भाषा सुरू केली आहे. हे लोण फार पसरू नये याबाबत सरकारला विचार करावा लागेल

-मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद आहे. सिनेमा, नाटय़गृह बंद पडल्याने या झगमगत्या व्यवसायावर जळमटे येऊ लागली; मुंबईचे बॉलीवूड व त्यांचे चमकते सितारे ही महाराष्ट्राची ओळखच नव्हे, तर वैभव मानले जाते, पण आता हा झगमगाट काळोखात गडप झाला आहे. लाखो लोकांचा रोजगार त्यामुळे ठप्प झाला आहे. कोल्हापूरप्रमाणेच मुंबईतील व्यापारी संतप्त झाल्याचे दिसत आहे.

-सध्या आठवडय़ातील पाच दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. आता मुंबईचे व्यापारी मंडळही बोलू लागले की, दुकानांची वेळ वाढवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू. शाळा, कॉलेज बंदच आहेत तसे हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योगाचीही वाताहत झाली. हॉटेलचा कर्मचारीवर्ग बेरोजगार झाला आहे त्याचप्रमाणे हॉटेल्सना भाज्या, दूधपुरवठा करणारे, लॉण्ड्रीवाले हे सगळेच धुळीस मिळाले आहेत.

-कोरोना व त्यामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे लोकांचे साफ कंबरडे मोडले. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असेल तर निर्बंध हटवावेत, असे सगळय़ांचेच म्हणणे पडत आहे. एका बाजूला कोरोनामुळे कडक निर्बंध तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याचे विदारक चित्र आहे. पाऊस गायब झाल्याने राज्यातील पाच जिल्ह्यांत दुष्काळांची गिधाडे फडफडू लागली आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत पाऊसच गायब झाला आहे. कोकणातही पुरेसा पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यातील २४ लहान-मोठय़ा धरण प्रकल्पांत जेमतेम २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध व दुष्काळ अशा कात्रीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक सापडले आहेत.

-केंद्राने नव्या फेरबदलात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बदलले व मनसुख मांडविया यांना आणले. पण लस तुटवडय़ाचा गोंधळ सुरूच आहे. केंद्रशासित लडाखसारख्या प्रदेशात १०० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, पण दुसऱ्या ‘डोस’चा गोंधळ सर्वच स्तरावर सुरू आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, राज्यांकडे साधारण दीड कोटीपेक्षा जास्त ‘डोस’ उपलब्ध आहेत. पण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा स्पष्ट दिसत आहे. मधून मधून लसीकरणास ब्रेक लागत आहे. लसीचा गोंधळ, पावसाची दांडी, निर्बंधामुळे निर्माण झालेले बेरोजगारीचे संकट या सगळय़ांचा सामना कसा करावा हा प्रश्न आहेच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढे यावे !

News Desk

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सीरमला भेट देत घटनास्थळाची पाहणी करणार

News Desk

लॉकडाऊनमध्ये दररोज दीड लाख लोकांना मिळणार ‘शिवभोजन थाळी’, छगन भुजबळांची माहिती

News Desk