HW News Marathi
Covid-19

कोरोना लशींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा!

मुंबई | कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे त्यांचे कर्तव्यच आहे परंतु चुकीची धोरणे व नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्य सरकारवर फोडून नामानिराळे राहण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. महाराष्ट्राला भरपूर लसींचा साठा दिला पण अपव्यय जास्त केला जात आहे हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय ६% नसून तो केवळ ०.२२% आहे. मोदी सरकारच्याच माहितीने जावडेकरांचा हा खोटारडेपणा उघड झाला आहे. चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपा व प्रकाश जावडेकरांचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र धैर्याने काम करत असून लसीकरणात महाराष्ट्राने देशासमोर आदर्श घालून दिला आहे. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लशींचा कमीतकमी अपव्यय ठेवला. परंतु दु:ख याचे वाटते की जावडेकरांसारखे भाजपा नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहेत.

लसींचा पुरवठा नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत, लोकांमध्ये लस घेण्यासाठी दांडगा उत्साह आहे, लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत पण अपुऱ्या लशींमुळे त्यांना हात हलवत परत जावे लागत आहे. गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात फक्त २३५४७ लशी कालपर्यंत शिल्लक होत्या.

नवीन लशींच्या साठ्याचे आश्वासन दिले आहे परंतु नरेंद्र मोदी जर वेळेवर लशी देत नसतील तर महाराष्ट्राने जनतेची सेवा कशी करावी? नियोजन कसे करावे? उठसुठ खोटे आरोप करुन महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात वेळेवर लशीं देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, असे सावंत म्हणाले.

अशोका विद्यापीठाच्या “सेंटर फॉर डाटा अँड अॅनालिसिस” या विभागाच्या “कोव्हीड वॅक्सिनेशन प्रोग्राम- नॉट अ रोझी पिक्चर” ( Covid vaccination program- Not a rozy picture by CEDA dept of Ashoka University) या अहवालात दर्शविल्याप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या व लोकसंख्या या निकषावर लसी वाटपात महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

तसेच ४५ वर्षांवरील लोकसंख्येचा विचार करता यातही लस वाटपात महाराष्ट्र १४ व्या स्थानी आहे. इतक्या कमी प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत आहे. परंतु महाराष्ट्राला केंद्राने सर्वाधिक लसी दिल्या असा अपप्रचार राज्यातील भाजपा नेत्यांकडून होत आहे.

लसींचा पुरेसा साठा आहे, महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात आहे असे जावडेकर व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन धादांत खोटे सांगत आहेत हे स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षाचे सरकार आहे या मानसिकतेतून महाराष्ट्राशी सुरु असलेली सापत्नभावाची वागणूक सोडा आणि १३ कोटी जनतेच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ८२४१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

कोरोना परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील ‘या’निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय

News Desk

कोरोना लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता कमीच – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

News Desk