HW News Marathi
महाराष्ट्र

दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला

मुंबई | ‘पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत.पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत.’ असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या आजच्या (३० सप्टेंबर) अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे.

सामनातून गेल्या दोन दिवसांपासून जी काही राजकीय खेळी सुरू आहे त्यावर भाष्य करण्यात आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा पलटवार शिवसेनेने केला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत.

राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही. देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.

एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त श्री. देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे श्री. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे? फडणवीस-राऊत भेटीत राजकारण नव्हते. ती एक सहज भेट होती याबाबत दोघांनी खुलासे केले. मुळात ती गुप्तभेट नव्हती.

शिवसेनेत कोणीच ‘गुप्तेश्वर’ नसल्याने ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे कारण नाही. शिवसेनेचा तो स्वभाव नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे व सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. अशी शंका श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही, पण चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे.

मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर ‘घडाळय़ा’चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घडय़ाळ आहे व घडय़ाळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घडय़ाळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न. महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांत अशांतता आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात उग्र निदर्शने सुरू केली आहेत. दिल्लीत शेतकऱयांनी प्रतीकात्मक ट्रक्टर जाळून निषेध केला आहे.

कोरोनाचे संकटही आहेच. अकरा दिवसांत देशांत कोरोनाचे 10 लाख नवे रुग्ण निर्माण होणे हे काही चांगले लक्षण नाही. सरकार आणि विरोधी पक्षांत या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी व अशी चर्चा ठरवून पहाटे पहाटे झाली तरी हरकत नसावी. राज्यात प्रश्नांचे डोंगर निर्माण झाले असताना राजकारणात उगाच फुसकुल्या सोडून प्रदूषण निर्माण करणे हे प्रगल्भतेचे लक्षण नाही. पाच वर्षे राज्य फडणवीस-पाटलांनीही चालवले आहे. त्यामुळे संकटकाळात काय करायचे व काय नाही याचे भान त्यांना असायला हवे. भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे व आज महाराष्ट्राचे भाजप सर्वेसर्वा म्हणून श्री. फडणवीस यांच्याकडेच पाहिले जाते. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे ‘फाइन’ प्रकृतीचे लक्षण आहे.

कधीच पूर्ण न होणाऱया स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱया मनाचे लक्षण आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

swarit

अभिनेता भरत जाधवची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ विनंती

News Desk

कोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात!

News Desk