HW News Marathi
महाराष्ट्र

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे!

मुंबई | ‘मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात व राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात व राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे!

मनसुख हिरेन हे नाव आणखी काही काळ गाजत राहील. त्यांचा मृत्यू झाला आहे व त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. संशयाचे वलय निर्माण करणे व प्रत्यक्षात संशयास्पद घडामोडी असणे यात फरक आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. ही गाडी म्हणजे अंबानींवर दहशतवादी हल्ला करण्याचाच कट असावा असे गृहीत धरले गेले. त्यानंतर ‘जैश-ए-मोहम्मद’ टाइप धर्मांध संघटनांकडून अंबानी कुटुंबास मारण्याबाबत धमकीपत्र वगैरे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला. प्रकरण अंबानींसंदर्भात असल्याने खळबळ माजली.

महाराष्ट्रात एका बाजूला पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असतानाच अंबानींच्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी उभी केली जाते व ती गाडी तशीच ठेवून चालक निघून जातो. सकाळी या गाडीचा संशय येतो व धावपळ सुरू होते. या सिनेमाची कथा-पटकथा प्रत्यक्षात पडद्यावर आली असती तर हा बिगबजेट सिनेमा पहिल्या शोलाच कोसळला असता, इतके कच्चे दुवे या रहस्यपटात आहेत. पण आता या फसलेल्या रहस्यपटाचा शेवट ‘हॉरर’ने घेतल्याने काहीतरी गडबड नक्कीच आहे. अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या मुंब्य्राच्या खाडीत सापडला आहे. मनसुख यांचा मृत्यू संशयास्पद आणि तितकाच रहस्यमय आहे.

विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना हे सर्व घडले आहे. ‘मारुती कांबळेचे काय झाले?’प्रमाणे मनसुख हिरेनचे काय झाले या प्रश्नावर विधिमंडळात चौफेर हंगामा होऊ शकेल. कारण विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शुक्रवारी मनसुखप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही काही माहिती दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीचा मनसुख यांना फोन आला. हा फोन तथाकथित पोलीस अधिकाऱ्याचा होता. त्यानंतर मनसुख घराबाहेर पडले ते आलेच नाहीत व त्यांचा मृतदेहच मुंब्य्राच्या खाडीत सापडला. मनसुख यांची गाडी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली. पण आपली गाडी चोरीस गेली आहे अशी तक्रार मनसुख यांनी चार दिवसांपूर्वीच दाखल केली होती. या सर्व प्रकरणात मनसुख यांचा तपास सुरू होता व ते प्रचंड तणावाखाली होते. त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव नक्कीच असावा व त्यातून त्यांचा मृत्यू झाला आहे.

मनसुख यांची आत्महत्या नसून हत्याच आहे, असे त्यांचे कुटुंबीय सांगतात. मग या हत्येमागचे सूत्रधार कोण हे शोधण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे. पूजा चव्हाण, मनसुख हिरेन, अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी हे सर्व कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातील विषय आहेत. विरोधी पक्षाने या सगळ्यांवर जोरकसपणे आपले मुद्दे मांडले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी गृह खाते सांभाळले आहे. त्याचा फायदा त्यांना होतोच. पोलीस खात्याच्या संदर्भातील आतली माहितीही त्यांना मिळते. मनसुख प्रकरणातील काही वेगळी माहिती त्यांनी मांडली, पण फडणवीसांनी जाहीर केलेली माहिती म्हणजे अधिकृत तपास यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष नाही, पण मनसुख प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होईल व सरकारला उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही. म्हणून अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली गाडी हेच मोठे रहस्य आहे.

अंबानी कुटुंबाची स्वतःची सुरक्षा व्यवस्था सरकारपेक्षा मजबूत आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीसी टीव्ही आहेत. कुणाही ऐऱ्यागैऱ्यास तिकडे फिरकता येत नाही. अशातच एक स्फोटकांनी भरलेले बेवारस वाहन तेथे येतेच कसे? याप्रकरणी मुंबई-ठाण्यातील 800 हून जास्त सीसी टीव्ही कॅमेरे तपासले, पण तपास इंचभरही पुढे सरकला नाही. मात्र आता तपासाचे एकमेव मुख्य दुवा असलेले मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन यांच्या रहस्यमय मृत्यूने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले.

स्वतः मनसुख जीवानिशी गेले. ‘माझे वडील चांगले पोहणारे होते आणि आत्महत्या करणाऱ्यांपैकी ते नव्हते. त्यांना कोणताही ताण नव्हता. फोन आला आणि ते बाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत,’ अशी माहिती मनसुखच्या मुलाने दिली. पण त्यांच्याकडील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही.

मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात व राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार, बोर्डाचे आदेश

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी परब थेट पवारांच्या भेटीला

News Desk

‘बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

News Desk