HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच! 

मुंबई | मुंबईत गेले २ दिवस पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही आजच्या (१९ जुलै) अग्रलेखात म्हटलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

कमी वेळेत पडणारा प्रचंड पाऊस कधी मालाड-मालवणीसारख्या, कधी डोंगरीसारख्या तर कधी चेंबूरसारख्या दुर्घटनांचा तडाखा मुंबईला देत आहे. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. 17 जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱयांनीही हे लक्षात घेतले पाहिजे.

शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. मुसळधार पावसाच्या रेटय़ामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱया घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. या दोन्ही दुर्घटनांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीची साखरझोप या जीवांसाठी काळझोपच ठरली. भांडुपमध्ये अमरकोट भागात वनविभागाची संरक्षक भिंत कोसळून सोहम थोरात या 16 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असतानाच डोंगरावरचे दगड आणि माती सोहमसाठी ‘यमदूत’ बनून आली. विक्रोळीमध्येही एक दुमजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 11 ते पहाटे 3 या केवळ चार तासांत सर्वाधिक पाऊस कोसळला. एवढय़ा कमी वेळात प्रचंड पाऊस कोसळल्याने चेंबूर आणि विक्रोळीतील दुर्घटना घडल्या हे उघड आहे. प्रचंड पाऊस आणि पाण्याचा रेटा यामुळे दरड खचली. संरक्षक भिंती कोसळल्या. चेंबूर येथील दुर्घटनाग्रस्त वसाहत डोंगराच्या पायथ्याशीच आहे.

मुंबईतील जागेची अडचण आणि त्या तुलनेत असलेली मोठी लोकसंख्या यामुळे निवासाचा प्रश्न पूर्वांपार बिकट आहे. त्यातून मुंबई आणि उपनगरांमधील छोटे-मोठे डोंगरही सुटलेले नाहीत. निसरडय़ा डोंगरउतारांवर वसलेल्या या झोपडपट्टय़ांत हजारो कुटुंबे पिढय़ान्पिढय़ा राहत आहेत. दर पावसाळ्यात त्या वस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत तब्बल 299 ठिकाणी दरडींवर झोपडपट्टय़ा आहेत. त्यापैकी 60 ठिकाणे धोकादायक तर 20 ठिकाणे अतिधोकादायक आहेत. मुंब्रा, कळवा येथेही डोंगरउतारावर शेकडो कुटुंबे राहतात. प्रत्येक पावसाळय़ात यापैकी कुठे ना कुठे दुर्घटना घडतात. मुंबईतील डोंगरउतारांवरील वसाहतींमध्ये लाखापेक्षा जास्त नागरिक राहत आहेत.

गेल्या 20 वर्षांत त्यातील 200 पेक्षा जास्त लोकांचा दुर्घटनांमध्ये जीव गेला आहे. ही डोंगरउतारावरील घरे काय किंवा जुन्या धोकादायक इमारती काय, मुंबईचा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे. मुळात मुंबईच्या स्वतःच्या भौगोलिक मर्यादा आहेत. त्याच्या विपरीत लोकसंख्येचा भार या शहराला पेलावा लागत आहे. आधीच जागेची मर्यादा आणि त्यात अमर्याद मानवी लोंढे यामुळे मिळेल तेथे, जमेल तसे राहा हे समीकरण दृढ झाले. मानवी लोंढे न थांबल्याने मुंबईतील निवासाचे गणित अधिकच जटील झाले आहे. डोंगरउतारांवरील शेकडो वसाहती आणि जुन्या धोकादायक इमारतींमध्ये ‘नोटिसा’ मिळूनही जीव मुठीत घेऊन राहणे, हे या गणिताचे सामान्य जनतेचे अपरिहार्य उत्तर आहे.

 

मुंबई महापालिका आणि प्रशासन त्यांचे जगणे सुसहय़ करण्याचा प्रयत्न आपल्या परीने करीत असले तरी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यात अलीकडील वर्षांत मुंबईतील पावसाची लहरही फिरली आहे. ‘कमी वेळेत प्रचंड पाऊस’ हे त्याचे वैशिष्टय़ झाले आहे. आताही मागील तीन दिवसांत मुंबईत तब्बल 750 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस कोसळला. जुलै महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस पडण्याची मागील 12 वर्षांतील ही चौथी वेळ आहे. ज्या शनिवारी मुंबईत पावसाने 11 दुर्घटना घडल्या, 30 जीव घेतले त्या शनिवारी तब्बल 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमी वेळेत पडणारा प्रचंड पाऊस कधी मालाड-मालवणीसारख्या, कधी डोंगरीसारख्या तर कधी चेंबूरसारख्या दुर्घटनांचा तडाखा मुंबईला देत आहे.

पावसाळय़ापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. 17 जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱयांनीही हे लक्षात घेतले पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला गळती नाही, ‘हा’ तर राजकीय भ्रष्टाचार !

News Desk

राज ठाकरेंचा मलाही फोन, लवकरच आम्ही भेटणार, मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

News Desk

मुंबई लोकल बाबतीत राजकरण नको, गृहमंत्र्यांनी खडसावले

News Desk