HW News Marathi
महाराष्ट्र

पुणेकरांनी गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! सामनातून पुण्यावर टिका करत दानवेंवर निशाणा

पुणे | एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे! अशी टिका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

पुणे व आसपासच्या परिसरात अधूनमधून हिंसक, अमानुष घटना घडत असतात. मनुष्य आहे तेथे रावण आहेच, पण रावणातही किमान माणुसकी होती. अशोकवनात सूक्ष्म रूपाने घुसलेल्या हनुमानाच्या शेपटीला त्याने फक्त आग लावली, निर्घृणपणे ठार केले नाही, पण आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत. शौर्य दाखविण्याच्या धुंदीत ते इतके निर्घृण झाले की, चुकून शहरात शिरलेल्या एका रानगव्यास हाल हाल करून मारले आहे. कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत सकाळच्या वेळी रानगवा दिसला.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

कोथरूडकरांना नेहमीप्रमाणे आधी चिंता वाटली व मग आश्चर्य वाटले. मुळात हा अगडबंब प्राणी म्हणजे नक्की काय आणि कसा? या संशोधनातच थोडा वेळ गेला असावा. हा माजलेला वळू आहे की रेडा? हा गेंडा आहे की मस्तवाल टोणगा? हे समजून घेईपर्यंत रानगवा इकडून तिकडे टकरा देत होता. जुन्नर, आंबेगाव परिसरात बिबटय़ाचे दर्शन होत असते. मनुष्यवस्तीत शिरून बिबटय़ा हल्लेही करतो, पण रानगवा नावाचा वजनदार प्राणीदेखील आता शहरात, गावात घुसून धुमाकूळ घालू लागला आहे. जंगलातील प्राणी मनुष्यवस्त्यांत घुसतात याचे मुख्य कारण मनुष्याने जंगलावर अतिक्रमण केले आहे.

असा एक गवा पुणे परिसरात घुसला व मनुष्याच्या क्रौर्यामुळे मृत्युमुखी पडला. आम्ही वाघ वाचवतो, साप वाचवतो. बिबटे, हत्ती वाचवतो, पण एका गव्यास निर्घृणपणे मारतो. याआधी रत्नागिरी, सांगली, वाळवा-शिराळा भागात गवा घुसला होता. भंडारा येथील गोसीखुर्द कालव्यात गवा पडला तेव्हा दोरीचा फास टाकून लोकांनी त्यास बाहेर काढले. रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या गव्यासही वाचवले होते, मग पुण्यात शिरलेल्या गव्यावर तडफडून प्राण सोडण्याची वेळ का आली? जंगलातील चारापाणी संपले असावे. त्या भटकंतीत गवा पुण्यात शिरला तर त्याला मारण्यात आले. आमच्या जंगल खात्याच्या कर्मचाऱयांना असे प्रसंग हाताळण्याचे नीट प्रशिक्षण आहे काय? त्यांनी पिंजरे लावून बिबटे पकडले असतील, पण रानगव्याचे रेस्क्यू ऑपरेशन जमले नाही.

गवा ताब्यात येत नव्हता. कारण गव्यापेक्षा लोकच जास्त बिथरले. लोकांनी गव्यास दगड मारले, हाकारेहुकारे देऊन त्याला या गल्लीतून त्या गल्लीत पळवले. गव्याचा मेंदू पुणेकरांप्रमाणे तल्लख, टोकदार नव्हता. गव्याचा मेंदू जंगली होता. तो मिळेल तिथे धडका देत राहिला. पुन्हा हा गवा म्हणजे एखाद्या मस्तवाल राजकीय नेत्याप्रमाणे उंडारतो आहे अशा भ्रमात लोकांनी त्याला घायाळ केले. गवा जखमी झाला तेव्हा वनखात्याच्या लोकांनी त्यास बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याच्या तोंडावर फडके बांधले. या सगळय़ा गोंधळात गव्याचे हृदय बंद पडले व त्याचे प्राणोक्रमण झाले. गवा हा डोंगराळ प्रदेशात आढळतो. दिसायला मजबूत बांध्याचा असला तरी तो शाकाहारीच आहे. त्याचे वजन 700 ते 1000 किलोपर्यंत असते. गवा कळपात राहतो.

गव्याची ताकद पाहता कोणताही जंगली प्राणी सहसा त्याच्यावर हल्ला करत नाही, पण पुण्यात शिरलेल्या गव्यावर आधी कुत्र्यांनी हल्ला केला व मग लोकांनी मारले. वाघ हा गव्याची शिकार करू शकतो. कळपात असेल तर गवाही वाघाला शिंगावर घेऊन आपटतो, पण पुण्यातील लोक हे वाघापेक्षा शूर झालेले दिसतात. त्यांनी एकटय़ादुकटय़ा गव्यास ठार केले आहे. कोविड-19 व लॉक डाऊन काळात जास्तच आराम फर्मावल्यामुळे पुणेकरांत हे जे हत्तीचे बळ संचारले आहे, त्याची दखल सरकारने वेळीच घ्यावी हे बरं. पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या रक्षणाबाबत सरकार जागरूक आहे. आरे जंगल, जंगलातील प्राणी वगैरे वाचविण्यासाठी सरकारने मेट्रो कारशेडची जागाच बदलली, वाघ बचाव आंदोलनात सरकार झोकून देते, मग रानगव्यास जगण्याचा अधिकार नाही काय?

मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱया कसाबलाही फाशीच्या तख्तावर जाईपर्यंत माणुसकीने वागवले जाते, पण मनुष्याच्या जंगलात शिरलेल्या गव्यास मात्र बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन मारले जाते. एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने एकही जागा न दिल्याने रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

News Desk

करुणा शर्मा यांना दिलासा! अवैध पिस्तूल प्रकरणी एकावर गुन्हा दाखल!

News Desk

एल्गार परिषद : शरजील उस्मानीचा पुण्यात पोलिसांनी नोंदवला जबाब

News Desk