मुंबई | अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करत विजय संपादित केला. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. भारतातही या निवडणुकीच्या चर्चा सुरू असून, अध्यक्षीय निवडणूक व विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भाष्य करताना शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना चिमटा काढला आहे. “ट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही,” असा आरोपही शिवसेनेनं आजच्या अग्रलेखातून केला आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?
हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले, तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ‘‘आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे.
अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्याच वेळी हिंदुस्थानातील बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून नेत्यांना बाहेर काढण्याचे काम लोकांनाच करायचे असते. प्रे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यासाठी थापांचा पाऊसच पाडला. एकही आश्वासन, वचन ते पूर्ण करू शकले नाहीत. अमेरिकेत आज बेरोजगारीची महामारी कोरोनापेक्षा भारी आहे, पण त्यावर उपाय करण्यापेक्षा ट्रम्प फालतू विनोद, माकडचेष्टा व राजकीय लफंगेगिरीलाच महत्त्व देत आले. शेवटी लोकांनी त्यांना घरी पाठवले. आपण पुन्हा जिंकलो नाही तर अमेरिकेचे नुकसान होईल, चीनचा फायदा होईल वगैरे बाष्कळ विधाने ते करीत राहिले, पण जनतेने त्यांना मतपेटीतून ठणकावून सांगितले, ‘‘आधी तुम्ही चालते व्हा, देशाचे काय ते आम्ही बघू?’’ पण पराभूत झाल्यावरही धडपणे सत्ता सोडतील ते ट्रम्प कसले? त्यांनी कोर्टबाजी, आरोप-प्रत्त्यारोप सुरू केले, इतकेच नव्हे तर आपल्या भाडोत्री समर्थकांना बंदुका घेऊन रस्त्यावर उतरवले, हिंसाचार घडवला. अशा माणसाच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व हिंदुस्थानातील भाजप पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यावध रुपयांची उधळपट्टी
करीत होते.
ट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही. आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण संपवले ते कायमचे. बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत आहेत व अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंध कृती योजना मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधी ट्रम्प यांनी कोरोनासंदर्भात फक्त विनोद, मजा, टाईमपासच केला होता. ट्रम्प यांनी पराभव स्वीकारायला नकार दिला आहे. मतमोजणी व मतदानात घोटाळे झाले आहेत, असा हास्यास्पद आरोप त्यांनी केला. अनेक मोठय़ा राज्यांनी ट्रम्प यांना नाकारले. ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्राची अप्रतिष्ठा होत असल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नाही. प्रे. ट्रम्प यांचा पराभव म्हणजे माजोरडेपणाचा, पैशांच्या मस्तीचा पराभव आहे. हाती सत्ता, पैसा आणि टगे मंडळींची टोळी असली की, हवे ते साध्य करता येते या मस्तीचा पराभव आहे.
लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघडय़ा घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल. जगातल्या प्रमुख लोकशाही राष्ट्रांत हिंदुस्थानबरोबर अमेरिकेचाही संदर्भ येतो, पण लोकशाहीचा लेप लावून काही लोक नौटंकी करीत असतात व ‘लोकशाहीचे बाप आपणच आहोत’, असा आव आणत असतात. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे.
कमला हॅरिस यांची व्यक्तिगत पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. एक महिला म्हणूनही कमला हॅरिस यांचा सन्मान राखण्याचे सौजन्य ट्रम्प यांनी दाखविले नाही व अशा ट्रम्प यांचे सगळय़ात मोठे पाठीराखे म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपवाले होते. आता हिंदुस्थानी वंशाच्या कमलाबाई अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे. कारण या कमला हॅरिस यांच्याबाबत सोशल मीडियावरून अपप्रचार करण्यात भाजपाई मंडळीच आघाडीवर होती. आता जर तेच हॅरिस बाईंच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत असतील तर हा ‘ट्रम्प’छाप विनोद म्हणावा लागेल. ते काही असो, हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे.
हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही. तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ‘‘आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.