HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

“सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली”, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई | ‘फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही. इथे तर लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे’  अशा शब्दांत शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे एका संतापलेल्या तरुणाने राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात लगावला. याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

फ्रान्ससारखेच वातावरण जगातील अनेक देशांत आहे. आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही. इथे तर लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे. हरिद्वार, वाराणसी, पाटणा येथील गंगा प्रवाहात या काळात प्रेतांचे तरंगणे व भडकलेल्या सामुदायिक चिता पाहून लोकांच्या मनात संतापाच्या ठिणग्या उडाल्याच असतील. म्हणून लोकांनी देशाच्या, राज्यांच्या सत्ताप्रमुखांच्या श्रीमुखात भडकविण्याचे उपक्रम सुरू केले नाहीत’ असं म्हणत सेनेनं भाजपवर निशाणा साधला.

‘फ्रान्स हा हिंदुस्थानप्रमाणेच लोकशाहीवादी देश आहे. आपल्याकडे इतकी लोकशाही रोमारोमांत भिनली आहे की, सारे काही सोसूनही आपल्या देशातील जनता संयमाचा बांध कधी तुटू देत नाही. ऑक्सिजनअभावी आप्त स्वकीयांचे डोळय़ासमोर तडफडून होणारे मृत्यूही आपल्या जनतेने निमूटपणे सहन केले. कोविडच्या रुग्णांना बेड मिळो न मिळो, औषधांची, इंजेक्शन्सची टंचाई असो, लसीकरणास कितीही कालावधी लागो, पण आपल्या देशातील सोशिक जनता सरकाराविरुद्ध पेटून कधी माथेफिरूसारखी वागताना दिसत नाही’ असंही सेनेनं म्हटलं आहे.

‘पण देशाच्या अध्यक्षांवर हल्ला करून लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत. अनेक राज्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले. आपल्याच देशात इंदिरा गांधी, राजीव गांधी, बियांत सिंग, इतकेच काय, जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासारख्या सेनानींना भररस्त्यात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले व यापैकी अनेकांना प्राण गमवावे लागले. अलीकडे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ला झाला, पण तो हल्ला पायावर निभावला. महात्मा गांधींची हत्या तर सार्वजनिक ठिकाणीच झाली. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष गड्डाफी यांना तर संतप्त लोकांनी भररस्त्यात ठार मारले. अमेरिकेचे राष्ट्रपती केनेडी यांनाही माथेफिरूने ठार केले’ असंही शिवसेनेनं इथं नमूद केलं आहे.

Related posts

उस्मानाबादचे टपाल कार्यालय लातूरला स्थलांतरित

News Desk

उस्मानाबाद जिल्ह्यात सव्वा कोटी रुपयांचा‌ 47 पोती गांजा जप्त‌; चौघे‌ तस्कर फरार

News Desk

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk