मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे कायम ठाकरे सरकारवर टीका करत असतातच. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही काम टीका करताना संदीप देशपांडे दिसतात. आता पुन्हा एकदा देशपांडेंनी राऊतांवर टीका केली आहे. आज (१९ मे) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल.
पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, असे देशपांडे यांनी म्हटले. या पत्रकारपरिषदेत संदीप देशपांडे यांनी महाविकासघाडीच्या नेत्यांनाही टोला हाणला. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय आणखी कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.