HW News Marathi
देश / विदेश

“महाराष्ट्र आणि बंगालने दाखवलंय, मोदींचा पराभव करतो येतो!”

मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या साडेत्तोड उत्तरासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय मोदी शहा आणि त्यांनी आखलेल्या रणनितीचा पराभव करतो येतो. आता चर्चा पे चर्चा नको, देशाला ठोस कार्यक्रमाची देण्याची गरज आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या आयोजित 19 राजकीय पक्षांच्या बैठकीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. तीन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधकांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीवर आजच्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत

विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरु झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे.

एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरु केली आहे

मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरु केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरु आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरु असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील.

म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो

प. बंगालातील विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. मोदींची सभा व शहांचे निवडणूक व्यवस्थापन म्हणजे विजय पताका फडकण्याची खात्रीच, हा भ्रम ममता बॅनर्जींनी धुळीस मिळवला. मोदींच्या 19 सभा होऊनही प. बंगालात ममतांचाच झेंडा फडकला व शहांचे सर्व राजकीय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन पराभूत झाले. म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो. ममता बॅनर्जी यांना जेरीस आणण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, न्यायालये व इतर सर्व यंत्रणांचा वापर आजही करीत आहेत. त्याविरोधातसुद्धा सगळ्यांनी एकवटले पाहिजे.

पराभव निवडणुकीच्या मैदानात आणि बुद्धिबळाच्या पटावरही करता येतो

प. बंगालात मोदी-शहांना जंतर मंतर करता आले नाही तसे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राजभवनाची प्रतिष्ठा पणास लावूनही सरकार स्थापन करता आले नाही. तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात उत्तम सुरु आहे. प. बंगाल व महाराष्ट्रात जे घडले ते विरोधी पक्षाला मार्गदर्शक आहे. भाजपचा पराभव निवडणुकीच्या मैदानात आणि बुद्धिबळाच्या पटावरही करता येतो हे दोन राज्यांनी दाखवले. त्यासाठी मनात व मनगटात लढण्याची जिगर पाहिजे इतकेच.

नौटंकीविरोधात एकत्र येणं गरजेचं

देशात शेतकऱ्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे, महागाई-बेरोजगारी आहे. पेगॅससचे गांभीर्य सरकार समजून घेत नाही, पण कधी तालिबान्यांचे भय निर्माण करायचे तर कधी पाकड्यांची भीती घालून लोकांची मने तापवून भावनांचे खेळ करायचे. आज तालिबानी अफगाणिस्तानात रक्तपात घडवीत आहेत व इकडे भाजपचे लोक सांगतात, ”हिंदुस्थानात मोदी आहेत म्हणून तालिबानी नाहीत. बोला, भारतमाता की जय!” हे असले उठवळ प्रचार करणाऱ्या ‘जत्रा’ मंत्री-संत्री करीत आहेत. या सगळ्या नौटंकीविरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

मोदी नामाची जादू उतरलीय, सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधकांनाही हातचलाखी करावी लागेल

‘2024 चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna

काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला !

News Desk

लोकसभेत अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन वेधले लक्ष!

News Desk