HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या सल्ल्याने आलो, अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला!

पुणे | महाविकासआघाडीतील ३ पक्षांपैकी २ पक्षांत वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. खेड पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा वाद अखेर पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (४ जून) खेडमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालावे, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“सरकारमधील पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. खेडमध्ये मात्र वारंवार घटना घडत आहेत. दोन-तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागतं. अलिखित करार, एकमेकांची माणसं फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही, असं असेल तर दोन पक्षांनी महिती देऊन समन्वय साधावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत

“लोकं फोडून सत्ता स्थापन करायची हे खेडमध्ये घडले. पंचायत समितीच्या जागेबाबत हा वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला, असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

…तर पालकमंत्री यांनी विचार करावा

“पंचायत समितीचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. आमदार दिलीप मोहिते यांची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू पुढच्या वेळी शिवसेनाच आमदार असेल. महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असं खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री यांनी विचार करावा”, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. तर, ६ सदस्यांना धमकावून आणि पैशाची मस्ती दाखवून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या बाजूने केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकांचे दुःख सतावत असल्यामुळे महाराष्ट्र बंदचा कांगावा, पडळकरांची राज्य सरकारवर टीका!

News Desk

भिवंडीतील म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज

News Desk

भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण

News Desk