HW News Marathi
महाराष्ट्र

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य! सामनातून भाजपवर निशाणा

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) नवे समन्स बजावले आहेत. येत्या ५ जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश वर्षा राऊत यांना देण्यात आले आहेत. त्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या दैनिक ‘सामना’तून शिवसेनेनं भाजपवर आज पुन्हा टीकेची तोफ डागली आहे. भाजप नेत्यांवर अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. भारतीय राज्य घटनेचे भाजपकडून कसे उल्लंघन करते आहे आणि स्वत:च नवीन घटना तयार करून आगपाडख करत असल्याची टीका करण्यात आली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

‘ ईडी ’ च्या बाबतीत ज्यांना ‘ घटना ’ आठवते त्यांनी राज्यपालनियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे . ‘ ईडी ’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे . कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो . बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही . सीबीआय , ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे . हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूत सडकी हवा जाते . त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप ! भाजपच्या ‘ नव्या घटना समिती ’ चा विजय असो ! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण ! हेच तुमचे भविष्य !

सध्या महाराष्ट्रात ‘ईडी’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे ‘ईडी’ प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका ‘महात्म्या’ने ‘ठाकरे सरकार’ पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी ‘ईडी पिडी’च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपवाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत. ईडीच्या वतीने भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू आहे.

‘ईडी’ची नोटीस वगैरे आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. नव्हे, कायद्याचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. कायदा सगळय़ांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत.

हा विनोदच म्हणावा लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता घटनेचा प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, ‘ईडी वगैरे संस्था या बिगर राजकीय असून त्या घटनेशी संबंधित आहेत. त्यामुळे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही का?’पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. घटनेची सगळय़ात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते.

मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? राज्यपालांनी या जागा लगेच भरायलाच हव्यात असे घटना सांगते. 2020 चे ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे ‘ईडी’च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. सध्या एक संवाद सर्वत्र गाजतो आहे तो म्हणजे, ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?’ त्यातलाच हा प्रकार! ‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे.

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताच त्यांना ‘ईडी’ची नोटीस यावी याला काय घटनेच्या चौकटीत राहत केलेले कार्य म्हणावे? आंध्र प्रदेशातील ‘टीडीपी’ खासदारांच्या घरावर ईडीच्या धाडी पडताच भेदरलेली मेंढरं निमूट भाजपच्या कळपात सामील झाली. ईडीचा प्रयोग लालू यादवांच्या बाबतीत फसला. प. बंगालात शारदा चीट फंड घोटाळय़ातील मुकुल राय वगैरे मंडळी एका रात्रीत भाजपमध्ये घुसली. महाराष्ट्रातही जे लोक ईडीचे गुणगान करून ईडीची नोटीस मिळताच कसे चौकशीला सामोरे जायला हवे असे मार्गदर्शन करीत आहेत, त्यांच्या पार्श्वभागात ईडी चौकशीचा बांबू घुसताच लंगड्या तंगडय़ांनी हे बोलभांड भाजपात सामील झाले. भाजपमध्ये सामील होताच असे सर्व लोक शुद्ध करून घेतले जातात व ईडी याकामी पौरोहित्याचे काम करीत असते.

म्हणूनच मुंबईतील ईडी कार्यालयासमोर काही जागरुक मंडळींनी हेच भाजप कार्यालय असल्याचा बोर्ड ठोकून दिला. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकविण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे. कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात.

मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या ‘नव्या घटना समिती’चा विजय असो! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव दंगल, मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्तानी – विखे पाटील

News Desk

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील खड्डे प्रशासनाने भरले

News Desk

राजकारण आणि टीका करण्याची वेळ नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

News Desk